You are currently viewing हे शेवटच्या दिवसा…!

हे शेवटच्या दिवसा…!

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*हे शेवटच्या दिवसा…!*

‘हॅलो….’
“काय रे…?”
‘अरे कुठे जायचे पार्टीला…?’
“कसली रे पार्टी..?”
‘अरे यार तू पण ना…. ३१ डिसेंबर नाही का उद्या…?”

डोक्यात झिंग गेल्यासारखी वाटली…
अरे म्हणजे उद्या वर्षाचा शेवटचा दिवस….!
मन गहिवरून आलं…वर्षभर सुखदुःखात साथ देणाऱ्या… आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी वेचून भूतकाळ बनणाऱ्या त्या शेवटच्या दिवसाला पुन्हा एकदा निरोप द्यावा लागणार…!
अरे, येताना किती आनंद, उत्साह घेऊन येत असतोस रे तू… अन् जाताना मात्र निराश करून जातोस…!
अरे, कधीतरी रहायचं ना रे चार दिवस जास्त मुक्कामाला…काय एवढी घाई तुला जायची…?
जाऊन तरी कुठे बंगले बांधणार आहेस…?
थोडी आमच्यासोबत सुद्धा मज्जा करायची ना रे… पार्टी शार्टी करू की रे मस्तपैकी सर्व मिळून…!
पार्टी हा शब्द ऐकताच आनंदाला उकळी फुटलेली… ग्लास मध्ये ओतलेल्या सोड्याला जसे बुडबुडे येतात अगदी तसेच बुडबुडे घशापर्यंत आलेले…तंदूर भट्टीतील लाल बुंद पेटलेले निखारे माझ्याकडे आ-वासून पाहत होते…
कधी एकदा हळद मीठ, लिंबू पिळून लाल तिखट नि तेलाचा लेप नाजूक गुलाबी अंगावर लावून मुरत ठेवलेल्या… नुकत्याच यौवनात आलेल्या “कुडूक् कुडूक्” म्हणून तरुणीच्या मागे घिरट्या घालणाऱ्या कोंबड्याला त्याच्यावर ठेवतो आणि चर्रर चर्रर आवाज करत त्याला भाजून खमंगदार तंदूर बनवतो… तसेच निखारे वाट पाहत होते… तर दुसरीकडे सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आपल्याला सोडून जातोय म्हणून मन सुन्न झालेलं…
गुलाबी थंडीत कोवळ्या उन्हाची किरणे खिडकीच्या कवडशातून डोकावत चेहऱ्यावर पडली अन् मनात नसतानाही उबदार गोधडीच्या घट्ट मिठीतून स्वतःला दूर करत मी कोवळ्या उन्हाशी अवचित सलगी केली…तरुणाने जुनी सोडून नव्या प्रेयसीच्या प्रेमात पडावं तसंच…! काल सायंकाळी मित्राशी आजच्या पार्टीचं झालेलं बोलणं आठवलं अन् “अरे तू आज जाणार, अगदी कायमचाच…हे लक्षात आलं…!
*निरोप तुझा घेताना*
*सुन्न झालं माझं तन..*
*परतून कधी येशील तू…?*
*विचारतय आतुर मन*

काय रे… काल परवाच आल्यासारखा वाटतोस आणि एवढ्यात निघालास सुद्धा…?
अरे, तू यावास म्हणून तुझी वाट पाहत आम्ही कधी बागेत, कधी गच्चीवर तर कधी हॉटेल, समुद्र काठावर धिंगाणा घालत असतो… तू येतोस हे आमच्यासाठी नाविण्यच… पण तुला त्यांचं काही वाटतं की नाही..?
खरंच रे, तुला काय वाटतं याचा आम्ही कधी साधा विचार सुद्धा केला नाही… जो जन्माला येतो तो कधीतरी जाणारच…हा निसर्ग नियमच…!
तू सुद्धा तसाच रोज सोनेरी दिव्यांचा दिपोत्सव साजरा करत…अंगावर रविच्या सोनकिरणांची रत्नजडित वस्त्रे परिधान करून एखाद्या सोहळ्यात चकचकीत लक्ष दिवे लावावेत अन् निशेचा काळोख उजेडात परावर्तित करावा तसाच संपूर्ण सृष्टी तेजोमय करून उदयास येतोस… झाडांवरचा पक्षांचा किलबिलाट…कुणी आपल्या बाळांचे गालगुच्चे घेऊन भुर्र उडून जातात…कुणी घरट्या भोवती घिरट्या घालत राहतात…नदी, नाल्यातील पाण्यात सांडलेली रविची किरणे परावर्तित होऊन मोत्यासारखा किरणोत्सार करतात… तू आल्याने लोकांची कामाची लगबग सुरू होते…डोक्यावर हांडे घेऊन बाया पाण्यासाठी नदीवर जातात… घागर भरतानाचा आवाज सुद्धा पहाटे प्रसन्न करतो…पोट भरल्यावर तृप्तीचा ढेकर द्यावा अगदी तशीच घागर भरताच “घुडूक् घुडूक्” करून ढेकर देते…!
तुझे आगमन फटाक्यांची आतषबाजी करून तर कुणी मद्याच्या नशेत तर्र होत डीजेच्या तालावर नाचत करतात… अक्षरशः नंगानाच करतात, स्वतःची शुद्ध हरपून जातात…डोळे नशेत डूबतात. त्या नशेलाही सुख मानतात…
खरंच तेव्हा तुलाही लाज वाटतच असेल, नाही का रे?
मला तर प्रश्न पडतो, लोक तू जातोस याचं दुःख म्हणून पितात की नवा कुणीतरी येणार याचं स्वागत म्हणून पितात? की तू पिण्यासाठी…निमित्तमात्र…!
मला तर वर्षभर सोबत करून तू जातोस याचंच दुःख अधिक होतं रे…
अगदी सूर्योदयापासून शांत निद्रिस्त होईपर्यंत तू रोज सोबतीस असायचाच…आणि दिवसभर जसा प्राजक्ताचा सडा अंगणी सांडतो तसा आयुष्यात आनंदाचा, सुखाचा सडा सांडून जायचास…
हो, कधी कधी दुःखे देखील पदरात टाकलीस…मी तक्रार नाही केली…कारण, निसर्ग नियमच आहे तो…सुखाच्या मागून दुःख येणारच…नाहीतर माणसाला सुखाचं महत्त्व कळणार तरी कसं…?
पण एक खरं आहे…मी रोज तुझ्याकडून काही ना काही अपेक्षा करत राहिलो अन् तू मात्र निस्वार्थीपणे देत गेलास…! तू कधीच का अपेक्षा नाही केलीस माझ्याकडून..? अरे वेड्या तू एवढे सुंदर क्षण माझ्या वाट्यास आणलेस मग तुझी अपेक्षा मी पूर्ण करणार नाही असंच वाटलं ना तुला…? “तुझ्यासाठी वाट्टेल ते…” एकदा बोलून तर बघ…!
सकाळच्या प्रहरी फुलांना आलेला बहर तू हर्षित होऊन पाहतोस परंतु त्यांना कोमेजताना मात्र पहायचं तू टाळतोस…अगदी तसच रे…तुला उदयास येताना मी डोळे भरून पाहतो…तो केशरी रंग पापण्यांच्या आड दडवून ठेवतो…परंतु अस्तास जातानाचा तांबडा रंग मात्र पाहवत नाही…कुठेतरी विरहाची लागलेली किनार मनाला छळते…निराश करते..!
कित्ती आनंदी असतोस तू पहाट होताना…हसत हसत सोनसळी किरणांची उधळण करतोस…इकडून तिकडून डोकावून पाहतोस, लपत छपत झाडांच्या आडून येतोस…सुष्टीला हर्शोल्लित करतोस… भर दुपारी भास्कराचा तेजोमय प्रकाशात न्हाऊन…घामाच्या धारांत भिजतोस तर कधी उन्हाच्या चटक्याने अंग भाजून घेतोस…संध्यासमयी प्रसन्न चित्ताने खिदळतोस… अन् हळूहळू चंद्राच्या शीतल छायेत निशेच्या मिठीत शिरतोस… पुन्हा एकदा नवा शृंगार करून उदयास येण्यासाठी… वेष पालटून दशावतारी रंगमंचावर नव्या भूमिकेत प्रवेश करणाऱ्या राजा सारखाच…!
हे शेवटच्या दिवसा….
खरंच तू शेवटचा असतोस का…?
की आम्हीच वेडे उगाच तुला शेवटचा समजून निरोप देतो…?
तू काल ही तोच होतास आजही तोच आहेस..फक्त वर्ष बदलले…तुझे जाणे येणे तसेच उरले…पण तू जातोस म्हटल्यावर भितीवरच्या कॅलेंडरने कात टाकली… अन् नव्या नवलाईला जागा मोकळी केली…तू मात्र तिथेच राहिलास…तरीही लोक तू गेल्याचं दुःख पचवून नवीन येणाऱ्याचं स्वागत करतात ही कधी कधी कमाल वाटते तर कधीतरी तू म्हणजे केवळ निमित्तमात्र…!
हे शेवटच्या दिवसा…आज तू जाता क्षणी साल २०२२ संपून २०२३ साल सुरू होईल… पण म्हणून मी मात्र तुला विसरू शकणार नाही…कारण ते जुळलेले आपले ऋणानुबंध आहेत…अगदी आयुष्यभर सोबत राहणारे….! म्हणूनच म्हणतो…
*नवे वर्ष जरी जाहले सुरू*
*तरी तुला मी कसा विसरू…*
*भले पुन्हा न भेटणार कधी*
*तरी मनोमनी एकमेका स्मरू…*

*नवीन वर्षांच्या शुभेच्छांसह…!*

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा