*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम गझल*
*सोस मायेचा*
*(वियदगंगा)*
*(लगागागा लगागागा लगागागा लगागागा)*
लळा हा लागता जीवा मला या मोहमायेचा
कितीदा अनुभवानेही न सोडी कोष मायेचा
कितीदा दूर जाण्याच्या विचाराने पुढे सरलो
पुन्हा ओढून पायाला अडवितो सोस मायेचा
मदाला दूर मी केले प्रयत्ने क्रोधही सुटला
तरीही या प्रपंचाचा न सुटतो भोग मायेचा
उरे ना लोभ मज काही मना ना मोह कोणाचा
परी नात्यातला गुंता असे हा दोष मायेचा
असूयेला नसे थारा अता आसक्त नाही मी
निघालो वानप्रस्थाला तुटे हा दोर मायेचा
— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई