You are currently viewing सेक्स आणि शराब

सेक्स आणि शराब

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव असो या प्रत्येक ठिकाणी ‘वो बोलेगा साला.. ऊ..ऊ.. बोलेगा साला.. – पुष्पा, वरदी कमरिया तेरी.. हाय ठुमकेश्वरी – भेडीया, आप जैसा कोई हीच गाणी सतत ऐकायला मिळत आहेत. विकृत, अश्लिल, संस्कृती आपले लक्ष जास्त आकृष्ट करते. ही काय भानगड आहे हेच कळेनासे झाले आहे. ठिकठिकाणी अशा उत्सवांमध्ये मुलांना अशा गाण्यांच्या तालावर झटके घ्यायला शिकवतात. रेकॉर्ड डान्स स्पर्धामध्ये आपल्या मुली अनुकरण करतात. मंत्री-संत्री मग पुरस्कार देतात. अशा स्पर्धांसाठी तरुण खंडणी गोळा करतात व एकंदरीत हजारो मुली या क्षेत्रात अवतरतात. हे सर्व कसे झाले व का झाले?

माझी मुलगी विचारते, ‘बाबा तुम्हाला मधुबाला का आवडते?’ टिव्हीवर चॅनलवर जास्त लक्ष केंद्रित असणाऱ्या मुलांना काय सांगावे? शरीराचा एकही अवयव उघडा न करता डोळ्यांच्या एका कटाक्षाने धुंद करणारे लावण्य एकीकडे आणि अर्धनग्न कमरेच्या झटक्याने थेट कामाग्नी पेटवणाऱ्या आधुनिक अप्सरांचे झटके दुसरीकडे. एकंदरीत संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये आपण आपली संवेदना कुठल्या पैलूवर उभारत आहोत? सेक्सबाबत आपण उघडपणे चर्चा करत नाही पण अंतर्मनात सेक्सचे विकृत स्वरूप घर करत आहे व आजची तरुणाई बेहोषपणे नंगानाच करत आहे.

१६ वर्षाच्या आमच्या एका विद्यार्थाला विचारले सेक्सबद्दल तुला काय कळते? तो म्हणाला, “यात कळायचे काय? तुम्हाला इंटरनेटवर सगळ दाखवतो.” या विद्यार्थ्याप्रमाणे बहुसंख्य तरुण गुगलवर जातात आणि फुकट बिभत्स सेक्सचे दर्शन घेतात. आज इंटरनेटसारखी अनेक आधुनिक साधने सहज घरात उपलब्ध होत आहेत. स्वातंत्र्याच्या नावावर आज सर्वत्र स्वैराचार व स्वच्छदपणा जोपासला जात आहे. म्हणून अलिकडे निर्भया पासून अनेक सामूहिक बलात्काराचे प्रकार घडत आहेत. सरकार आणि समाज याकडे हतबलपणे पाहत आहे. या सगळ्यापुढे कुटुंबव्यवस्था तर हतबल झालीच आहे, पण सरकारही त्यापुढे विवस्त्र झाले आहे. अमेरिकन भांडवलशाहीने प्रसार केलेल्या सेक्स व शराब संस्कृतीचा वर्तमानावर आणि भविष्यावर होत असलेला हा परिणाम आहे. आपली मुले आधुनिक तंत्रज्ञानातून – इंटरनेटमधून ज्ञानाचे अमृत प्राशन करू शकतात, पण त्याचवेळी ही मुले हिडीस, बिभत्स व विकृत मानसिक स्थितीकडे पोहचत आहेत. यावर उपाय काय तर समोर काहीच दिसत नाही. समाजातील नितीमुल्ये नावाचा शब्दच शब्दकोषातून लुप्त होत आहे.

अमेरिकन भांडवलशाहीने माणसाला विकलांग करून उपभोगवादी बनवण्यासाठी वाटेल ते केले. त्याचे प्रमुख सूत्र ‘सेक्स’ आणि ‘शराब’. हॉलीवूड नाईट क्लबमधून थिरकणाऱ्या नग्न बाला ह्या या संस्कृतीच्या प्रमुख आकर्षण ठरल्या व विकृती हे मानसिक हत्येचे धारदार शस्त्र बनले. कारण प्रचंड नफा मिळवणाऱ्या अमर्यादित स्पर्धेत भांडवलदारांची काळी कृत्ये लपवण्यासाठी, समाजाचे लक्ष अन्यत्र वळवायला ‘सेक्स’ आणि ‘शराब’ ही अतिशय घृणास्पद हत्यारे ठरतात. हॉटेल, बार, दारूचे कारखाने, फॅशन इंडस्ट्री, मॉडेलिंग, टि.व्ही., सौंदर्य प्रसाधने, उद्योग या माध्यमातून कितीतरी भांडवलदार गरिबांच्या पैशावर मालामाल झाले.

वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाही बिभत्सतेकडे गेली. सेन्सॉरशिप असतानाही आज आमची मुले ‘मिलेगी- मिलेगी’ या गाण्यावर नाचणाऱ्या विदेशी नग्न पोरी बघत वाहवत चालली आहेत. अमेरिकन समाज तर विकृत झालाच आहे, पण जगभरातही सामाजिक अस्थिरता फोफावत चालली आहे. ह्यालाच उदारीकरण व जागतिकीकरण म्हणतात का?

सेक्स हा खाजगी विषय आहे व तो खाजगीच राहिला पाहिजे. बेडरूममध्ये विविस्त्र असणारे जोडपे सार्वजनिक ठिकाणी विविस्त्र राहू शकत नाहीत. म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्यावर कायदेशीर तशीच सामाजिक बंधने असतात. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा पार केल्यावर विकृतीला सुरुवात होते. जसे सैन्यामध्ये दारू प्यायला परवानगी आहे, पण दारू पिऊन झिंगण्यास परवानगी नाही. दारू पिऊन वेडेवाकडे वागल्यास आर्मी अॅक्टच्या सेक्शन ६३ प्रमाणे गैरवर्तणूक करणे म्हणजे सैनिकाला साजेसे न वागणे यासाठी ३ वर्षाची शिक्षा होऊ शकते. भारतात ब्ल्यू फिल्मला बंदी आहे. कारण त्याचा अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होतो. हे जर खरे आहे तर ‘‘वो बोलेगा साला.. ऊ..ऊ.. बोलेगा साला.. – पुष्पा, वरदी कमरिया तेरी.. हाय ठुमकेश्वरी – भेडीया, आप जैसा कोई.. या गाण्यांचे चित्रण ब्ल्यू फिल्मपेक्षा हानिकारक आहे त्याचे काय?

‘दबंग’मध्ये सलमान खान इन्स्पेक्टरच्या गणवेषात दारू पिऊन नाचताना दाखविला आहे. त्यात पोलीस स्टेशनलाच दारूचा अड्डा बनवलेले दाखवले आहे. या चित्रणाला भारतातील पोलीस दलातील कुणालाही आक्षेप घ्यावासा वाटला नाही. मला वाटते पुढे एखाद्या चित्रपटात मुख्यमंत्र्यांचे दालनदेखील दारूचा अड्डा झालेले दाखविले जाईल व मुख्यमंत्री डोक्यावर दारूची बाटली घेऊन नाचातानाही दिसेल. या सारख्या नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून दारू पिण्याला एक प्रतिष्ठित फॅशन बनविण्यात आले आहे.

आजकाल रात्री रस्त्यावर, बीचवर तरुण मुले-मुली चाळे करताना सर्रास दिसतात. हा विषय फक्त एक कला म्हणून, एक करमणूक म्हणून दाखवला जातोय असा गोड गैरसमज कुणी करून घेवू नये. वस्तुतः यापाठीमागे दारू लॉबीचा प्रचंड पैसा लागलेला असतो. लोकांनी जास्तीत जास्त दारू प्यावी म्हणून मुद्दामहून गाण्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यात येते व दररोज टीव्हीवर हीच गाणी सातत्याने दाखविली जातात. परिणामी जगातील नामवंत ब्रँडच्या दारूचा खप भारतात झपाटयाने ४०० टक्क्यांनी वाढत आहे. पब, बार जोरात चालू आहेत. त्या माध्यमातून विजय मल्ल्यासारखे दारू उत्पादक लोकानी प्रचंड पैसा कमावला व देश सोडून फरार झाले. हे आयपीएलची क्रिकेट टिमदेखील विकत घेतात. हे लोक आमदारांना विकत घेऊन खासदारकी सुद्धा मिळवतात. खासदारकी मिळवल्यावर हे दारूसम्राट पार्लमेंटमध्ये दारूची विक्री वाढवण्यासाठी धोरण राबवणार की, आदिवासी मुलांना दुध मिळावे म्हणून प्रयत्न करणार?

सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी शर्मिला टागोर होत्या. त्यांना एकाने विचारले की आताचे सिनेमा मुली आणि तिच्या पित्याला एकत्र बसून बघता येत नाहीत. त्या म्हणाल्या की सिनेमा हा धंदा आहे. जर मुलींना आणि पित्याला एकत्र बघता येत नसेल तर बघू नये. अशा लोकांनी सेन्सॉर बोर्डच अस्तित्वात नाही अशी अवस्था केली. नाहीतरी आज इंटरनेट वर सगळेच दिसते. त्यामुळे सेन्सॉरला काहीच अर्थ उरला नाही.

भांडवलशाहीचे दुसरे नाव म्हणजे भोगवाद. म्हणजे शरीराचे सर्व चोचले पुरवणे याचाच अर्थउपभोग. उपभोगामुळेच खाण्याचे पदार्थ, नशेचे पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, फॅशन-कपडे, करमणुकीची साधने यावर आधारीत मागणी म्हणजेच बाजारपेठेवर आधारीत अर्थव्यवस्था. त्यामुळे भांडवलशाहीचा संस्कृतीवर परिणाम काय होत आहे याचे भान कुणालाही नाही. मात्र सामाजिक उत्क्रांतीमध्ये भांडवलशाहीने समाजाला विकृत करून सोडले आहे एवढे निश्चित. म्हणूनच आर्थिक उन्नती ही मानवी जीवनाचे एकमेव उद्दिष्ट होऊ शकत नाही. कधी कधी आर्थिक प्रगती सामाजिक सुदृढतेसाठी रोखावी लागते. हाच समतोल आज नष्ट झालेला आहे याची मांडणी कुठेच होत नाही व म्हणूनच समाज शीड नसलेल्या जहाजासारखा भरकटत जात आहे.

माझ्या दृष्टीकोनातून प्रत्येक व्यक्तीच्या जिवनाचे उद्दिष्ट आनंद हेच असले पाहिजे. दूरवरच्या नागालँडच्या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनातला आनंद करोडो रुपये खर्च करून देखील कॉंक्रीटच्या जंगलात मिळत नाही. त्यामुळे पैसा हा मानवी जीवनात आनंदाचे मोजमाप ठरू शकत नाही. समता, सहिष्णुता, बंधुत्व, मित्रत्व, मातृत्व, पितृत्व अशा अनेक पैलूमध्ये वसलेले सामाजिक जीवन हे नाजुक धाग्यांनी गुंफावे लागते आणि हे गुंफण्याचे काम कुणी करायचे, हाच खरा आजचा सवाल आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा