सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांना निवेदन सादर
बांदा
शहरात २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सर्व पुरग्रस्त व्यापाऱ्यांना ५० हजार रूपये नुकसान भरपाई मंजुर केली होती. त्यातील काही व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत जमा करण्यात आली नाही. शासनाकडे भरपाईची रक्कम जमा असूनही नुकसानग्रस्ताना भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे. येत्या ८ दिवसात भरपाई न दिल्यास सर्व व्यापाऱ्यांसह तहसीलदार कार्यालयसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन महिन्यापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम रक्कम सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आलेली आहे. परंतु अदयापही वेळोवेळी पाठपुरावा करूनही ती रक्कम अजून व्यापाऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तत्कालीन बांदा तलाठी फिरोज खान यांनी मोलाचे सहकार्य करून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना लाभ मिळवून दिला होता. मात्र शासनाने वेळीच दखल घेऊन व्यापाऱ्यांना भरपाईची रक्कम तात्काळ अदा करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शिवसेनेचे ओंकार नाडकर्णी, प्रशांत पांगम, भाऊ वाळके आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार उंडे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.