You are currently viewing तेरेखोल खाडीतील वाळू माफियांना रोखा, अन्यथा संघर्ष झाल्यास प्रशासन जबाबदार; सावंतवाडीत प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर 

तेरेखोल खाडीतील वाळू माफियांना रोखा, अन्यथा संघर्ष झाल्यास प्रशासन जबाबदार; सावंतवाडीत प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर 

आरोंद्यातील मच्छीमारांकडून आंदोलनाचा इशारा…

सावंतवाडी

आरोंदा खाडीत गोव्यासह सिंधुदुर्गातील वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. रातोरात ही वाळू काढली जात असून दुसरीकडे रात्री मासेमारीसाठी जाणार्‍या मच्छीमारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाच्या विरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान प्रशासनाने हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा वाळू माफिया आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात संघर्ष झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा आरोंदा येथील मच्छीमारांकडून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना देण्यात आला आहे. आरोंदा मच्छीमार समितीचे अध्यक्ष गोकुळदास मोटे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात राहणार्‍या मच्छिमारांनी आज श्री. पानवेकर यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी आरोंदा खाडीक्षेत्रातील तेरेखालखाडी मध्ये बेकायदेशीरीत्या रात्री अपरात्री वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाळू काढताना नांगराना जाळ्या लागत असल्यामुळे जाळ्याचे नुकसान होत आहे. तसेच खाडीचे पात्र खोल व रुंद झाल्यामुळे खाडीच्या किनार्‍यावर असलेल्या घरांना धोका आहे. तसेच मध्यरात्री वाळू उपसा करणार्‍या माफियांच्या मजूरांकडून आरडाओरड केली जाते. त्यामुळे किनार्‍यावरील राहणार्‍या ग्रामस्थांना आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे या प्रकाराची तात्काळ दखल घेवून संबधित वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमची आंदोलनात्मक भूमिका राहील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी उपाध्यक्ष नयन चोडणकर, मनसेचे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, वसंत चोडणकर, प्रमोद चोडणकर, भानुदास तारी, मिलिंद पेडणेकर, सुनिल वेर्णेकर, नरेश पिळणकर, श्रीपाद तारी, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा