*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखित अप्रतिम लेख*
*गेले ते दिन गेले….*
*✒️सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337
*वेगवेगळी फुले उमलली*
*रचूनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले.गेले ते दिन गेले*
*कदंब तरुला बांधून झोले,एकमेका दिले घेतले.गेले ते दिन गेले*
एफएम वर हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील हे सुरेल भावगीत जेव्हा जेव्हा आपण ऐकत असतो, तेव्हा तेव्हा मन हुरहूरत असतं.
भूतकाळाच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात.
तसे पाहिले तर सगळ्यांचाच भूतकाळ खूप रम्य असतो असे नाही. तर कित्येक जणांचा भूतकाळ हा त्यांनी केलेल्या संघर्षाची जणू गाथाच असते.पण आपण हुरहुरत असतो ते गेलेल्या वयासाठी.काळ कुणासाठी
थांबत नाही.चांगलं,वाईट असं सगळं काही तो जाताना आपल्या सोबत नेत असतो आणि त्याचबरोबर नेत असतो आपलं वय.
माणसाचा जन्म हा भूतकाळातील साखळदंडांनी बांधून ठेवण्यासाठी झालेला नसला तरी येणारा काळ आपल्या हातात नसतो आणि त्यावर आपला हक्कही सांगता येत नसतो. मग हक्क दाखवण्या साठी उरतो तो फक्त भूतकाळ.तोच आपल्या मालकीचा असतो.तो आपल्यापासून कुणी ही हिरावून घेऊ शकत नाही.कारखान्यात साधा कामगार असलेला माणूस जेव्हा त्या कारखान्याचा मालक बनतो तेव्हा ही तो आपल्या भूतकाळातील संघर्षाला ताठ मानेनेच सांगत असतो.
व्यक्ती,कुटुंब,समाज आणि राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ,वर्तमान काळ आणि भविष्य काळ असतोच असतो.जीवन सरिता ही पुढे पुढेच वाहत असते.जेव्हा एखादे मूल वाढत असते,ते मोठे होते, तेव्हा त्याच्या तरुण वयात त्याचे बालपण हा त्याचा भूतकाळ असतो.तारुण्य हा त्याचा वर्तमान असला तरी वृद्धत्व हा त्याचा भविष्य काळ आहे. आत्तापर्यंत कोणी वृद्धत्वाची आतुरतेने वाट पाहिली असे माझ्या तरी ऐकण्यात नाही.म्हणून मला ग.दि. माडगूळकरांचे काळाचे यथार्थ वर्णन केलेले एक गीत कायम आठवत राहते.
*बालपणाची मुकी अंगडी*
*रंगीत वसने तारुण्याची**
*जीर्ण शाल मग उरे शेवटी वृद्धत्वाची.*
जीवनात खरी प्रगती करायची असेल तर आपल्या आयुष्याचा भूतकाळ कधीही विसरता कामा नये.कारण भूतकाळ हा इतिहास असतो.असे म्हटले जाते कि जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांना उज्वल भवितव्य निर्माण करता येत नाही. कारण
भूतकाळाच्या खांद्यावर बसूनच वर्तमान काळ भविष्याची सुंदर स्वप्ने पाहू शकतो. म्हणूनच भूतकाळ मागे टाका पण त्याला विसरू नका. वर्तमान जगा. पण भूतकाळ आठवा.तरच तुम्हाला उज्वल भवितव्य घडवता येईल. भूतकाळ तुम्हाला प्रेरणा देत असतो, बळ देत असतो. काहींचा भूतकाळ मात्र एकांतात अश्रू शिवाय काहीच देत नाही.भूतकाळ म्हणजे जणू सूर्यास्त असतो. जो आपण देखावा म्हणून पाहत असतो.वर्तमानात झालेला सूर्योदय मात्र आपण हात जोडून वंदत असतो.पण आपले पाय जमिनीवर ठेवण्याचे काम भूतकाळच करत असतो. एखादी न भरून येणारी हृदयातील जखम ही सुध्दा भूतकाळाचीच देण असते. आयुष्याच्या संध्याकाळी ती आठवली की मग काय अवस्था होते हे सांगायलाच नको.
*तुम ना लगा पाओगे अंदाज मेरी तबाही का,*
*तुमने देखा ही कहा है मुझे शाम होने के बाद.*
म्हणूनच म्हणावेसे वाटते कि कोणाचा भूतकाळ रम्य,लोभसवाणा तर कुणाचा भलभलती जखम असणारा कसा ही असला तरी आठवण देणारा.
वास्तवाचा दाह भूतकाळात अनुभवलेली माणसं आणि त्यांची मनं आगीत भाजून कणखर झालेली असतात. वरवर पाहता ती तजेलदार दिसतील परंतु आत खोल तळाशी भूतकाळातील वास्तव नावाचा अग्नी सतत प्रज्वलित असतो.तो त्यांना भरकटू देत नाही.माणसांच्या चेहऱ्या पलीकडे जाऊन त्यांना ओळखण्याची , पारखण्याची जाणीव तो करून देत राहतो म्हणूनच भूतकाळ सर्वांसाठी महत्वाचा ठरतो.कौतुकाचे सोहळे रंग विण्याचे वर्तमान आणि भविष्य त्यांनाच मिळते ज्यांचा भूतकाळ हा कष्टदाई व संघर्ष मय असतो.
———————————-