कलंबिस्त येथील बेशुद्ध युवकाला रुग्णालयात नेत केले उपचार
भुकेने व्याकुळ मातेलाही दिला मदतीचा हात
सावंतवाडी
समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सामाजिक बांधिलकी टीमने पुन्हा एकदा आपला वसा जपला. सावंतवाडी मच्छी मार्केट शेजारी यशोदा वस्तीत पडलेल्या कलंबिस्थेतील युवकाला रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर उपचार करून घेतले तर त्याच्यासोबत भुकेने व्याकुळ झालेल्या त्याच्या मातेलाही मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली.
सुलोचना वसंत पास्ते (६०) व तिचा मुलगा सुनील वसंत पास्ते (३५, दोघेही रा. कलंबिस्त ) ही गेले काही दिवस सावंतवाडी शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, उपाशीपोटी असल्याने यातील सुनील हा सावंतवाडी मच्छी मार्केट लगत यशोदा वस्तीत असल्याची माहिती नागरीक चंदन नाईक यांनी सामाजिक बांधिलकी टीमला दिली. त्यानंतर सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर परिस्थिती पाहून रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे व त्याचे सहकारी लक्ष्मण शिरोडकर त्वरित स्वतःची ॲम्बुलन्स घेऊन आले बेशुद्ध युवकाला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर सुनील पास्ते या युवकाच्या हाताला गंभीर जखम झाली होती तर त्याची आई भुकेने व्याकुळ पडली होती. सामाजिक बांधिलकीच्या टीमने त्यांना खाऊ दिल आणि हेलन निब्रे यांनी घरी जाऊन त्या दोघांसाठी कपडे आणले व त्या वृद्ध महिलेला व आजारी युवकाला स्वच्छ करून नवीन कपडे दिले.
या कार्यात सामाजिक बांधिलकीच्या हेलन निब्रे, समीरा खलील, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, रवी जाधव तर सामाजिक कार्यकर्ते हेमंत वाळके व लक्ष्मण शिरोडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी संघटनेने दाखवलेल्या या बांधिलकी बाबत नागरिकांमधून कौतुक होत आहे.