नितेश राणे यांनी वेधले वनमंत्र्यांचे लक्ष
वन विभागात कर्मचारी भरती देखील तातडीने करणार
कणकवली :
वन्य प्राण्यांपासून जनतेला संरक्षण व्हावे त्यांच्या पिकाची नासधूस थांबावी. हत्ती, गवारेडे, माकड यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव थांबावा यासाठी वन विभागाकडून समिती गठीत केले जाणार आहे आणि या समितीवर आमदार नितेश राणे यांचा समावेश करून शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्या सर्व सूचना अमलात आणल्या जातील अशी ग्वाही विधानसभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कोकणात वन्य प्राण्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात. वन कर्मचारी आणि रिक्त असलेल्या पदांची भरती करावी. हत्ती, गवारेडे ,माकड व इतर प्राणी यांना गावातून जंगलात हाकलण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बंदूक तयार करून, कोणत्याही प्राण्यांची जीवित हानी न करता हे प्राणी जंगलात पाठवले जातात तशा बंदुका पुरविल्या जाव्यात आणि त्यासाठी मॅनपावर आणि आवश्यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला जावा अशी मागणी विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी केली. त्यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पदभरती करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी परवानगी दिलेली आहे.जवळपास तीन हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस नावाच्या कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे. वन्य प्राण्यांचा उपद्रव कसा थांबवावा यासाठी वन विभाग एक समिती गठीत करणार आहे त्या समितीवर आमदार नितेश राणे याचा समावेश करून त्यांच्या प्रत्येक सूचना जनतेच्या हितासाठी कशा अमलात आणता येतील याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.