You are currently viewing भाजयुमोने आवाज उठवल्यामुळेच मालवण न. प. च्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती

भाजयुमोने आवाज उठवल्यामुळेच मालवण न. प. च्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती

मंदार केणी, यतीन खोत यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये ; विजय केनवडेकर यांचा सल्ला

मालवण

मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी देण्यात आला. या साहित्यातील एक- दोन वस्तू खराब असतील तर ही बाब समजण्या सारखी होती. मात्र सर्वच्या सर्व साहित्य सदोष असणे म्हणजे या संपूर्ण ठेक्यातच गोलमाल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. संपूर्ण साहित्य सदोष असताना आमदार वैभव नाईक यांनी या साहित्याचे उदघाटन करण्याची घाई का केली ? उदघाटनानंतर व्यायामशाळेतील व्यायामपट्टूनी भाजयुमोकडे तक्रार केल्यानंतर भाजयुमोने आवाज उठवताच हे साहित्य खराब असल्याची कबुली देत तातडीने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी आम्ही आवाज उठवला नसता तर हे खराब साहित्य नागरिकांच्या माथी मारण्याचा डाव होता. त्यामुळे दुरुस्त करून आलेल्या साहित्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मंदार केणी आणि यतीन खोत यांनी करू नये, असा सल्ला भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिला आहे. लवकरच भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह या ठिकाणी पाहणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मालवण पालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती करून आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या मंदार केणी आणि यतीन खोत यांच्याकडून त्याचे श्रेय घेण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. मालवण नगरपालिकेतील व्यायामशाळेतील साहित्याच्या त्रुटी दूर करून ते पुन्हा व्यायामशाळेत बसविण्यात आले असल्याची माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी देत आहेत. ज्यावेळी व्यायामशाळेचे साहित्य बसविण्यात आले व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत उद्घाटन केले, तेव्हा हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे हे न पाहताच उद्घाटन का केले, याचे पण उत्तर केणी यांनी जनतेला दिले पाहिजे. व्यायामशाळेचे साहित्य उद्घाटन झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा मार्फत साहित्य पाहण्यास गेले असता या साहित्यावर व्यायामपटू व्यायाम करण्यास तयार नव्हते. या साहित्यावर व्यायाम करता अपघात होण्याची शक्यता दाट होती. याची विचारणा मुख्याधिकारी यांना करता हे साहित्य अजूनही मालवण नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेले नाही त्यामुळे आम्ही या साहित्यात जबाबदार नाही, असे उत्तर देण्यात आले होते. असे असताना अधिकाऱ्यानाच डावलुन उद्घाटन करणे बरोबर होते का ? असं सवाल विजय केनवडेकर यांनी केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा