सिंधुदुर्गनगरी :
राज्यातील प्रत्येक मुल प्रगत व्हावे यासाठी प्रत्येक शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहेत. सद्याच्या कोविडच्या काळातही शिक्षक व अधिकारी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करुन विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध नाविण्यपूर्ण प्रयोग नवोपक्रमशील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 अंतरग्त राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका, पर्यावेक्षिका, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विषयसाधन व्यक्ती, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षिय अधिकारी ( केंद्र प्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) अशा पाच गटांमध्ये होणार आहे.
या नवोपक्रमाचे विहीत नमुन्यातील लेखन करून दिनांक 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत innovation.scertmaha.ac.in. या लिंकवर सादर करावयाचे आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक, मुख्याध्यापक व इतर पर्यावेक्षिय यंत्रणेने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पी. व्ही. जाधव, प्राचार्य, शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.