*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललीतलेख*
*एक प्रवास जीवनाकडे….!!*
जन्माला आला तो प्रत्येक जण एक प्रवास करतच पुढे चालत असतो…मातेच्या गर्भातून जन्म घेणारा मनुष्यप्राणी असो वा छोट्याशा बिजांकुरातून उगवणारं रोपटं…वा दिवस दिवस अंगातली ऊब देऊन उबवलेल्या अंड्यातून बाहेर येणारं लुसलुशीत इवलंसं पिल्लू… हळूहळू नवनिर्मितीकडे झेपावतात… जीवन जगता जगता कधी आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश करतात हेच समजत नाही. प्रत्येक जण जीवन जगण्याचा नवा मार्ग शोधतो अन् आपापल्या इच्छेनुसार जगून घेतो. म्हणून असं म्हणतात की जीवन म्हणजे जन्म आणि मृत्य यामधील प्रवास…!
आयुष्य म्हणजे केवळ जगणं असेल परंतु जीवन म्हणजे माणसामधील प्राण्यांचा अंश कमी होऊन माणूस म्हणून जगणे. माणूस म्हणून समग्र जीवन जगताना मन, शरीर, बुद्धी आणि संस्कार एकत्रित विचार करून जगलं तरंच जीवनाचं सुंदर गीत तयार होईल आणि सुकर, सुंदर जीवन जगता येईल.
जीवन गाणे गातच रहावे…
झाले गेले विसरुनी जावे
पुढे पुढे चालावे….जीवन गाणे.
सजीव सृष्टीमध्ये केवळ माणूस हाच असा प्राणी आहे जो भूतकाळात स्वतःला गाडून घेतो आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो…झाले गेले विसरून जर जीवन जगलं तर फुलपाखरांसारखे स्वच्छंदी सुंदर आयुष्य जगता येईल. एका पुलावरून दुसऱ्या फुलावर बसणारे फुलपाखरू पुंकेसरातून रस प्राशन करून स्वच्छंदी विहार करत असतं… परंतु फुलांवर बसताच आपल्या नाजूक स्पर्शाने फुलांना मोहित करते… गोंजारते… हळूच एखादा गालगुच्चा देते आणि अलगद उडून जाते…फुलपाखराचा तो स्पर्श हवाहवासा वाटू लागतो…परंतु जीवनात मिळालेलं तेच क्षणिक सुख भोगून जीवनप्रवास सुरूच राहतो…माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला मायेने, प्रेमाने कुरवाळून जगण्याचा आनंद घ्यावा…तरच स्वतः सोबत जीवनात येणाऱ्या प्रत्येकाचा जीवनप्रवास सुखकारक होईल…फुलपाखरांसारखेच स्वच्छंदी जीवन जगताना स्वतःलाही वेळ देणे आवश्यक आहे. माणसाला सर्वांसाठी वेळ असतो परंतु स्वतःसाठी नसतो…कधीतरी स्वतःलाच एकदा आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पहा…नित्य व्यस्तच येईल…जीवनाकडे प्रवास सुरु असताना स्वतःसाठी वेळ देणे तेवढेच आवश्यक असते. जीवनाच्या वेलीवरती सुखदुःखाची फुले उमलती… सुख भेटता खुलुनी येती…दुःखामध्ये घेती झाडाझडती…!
जीवनामध्ये कुणी मोठं होणं…म्हणजे मुंगीने हत्ती होणे… हे प्रगती, यशस्वी होणे नाही तर मुंगीने चांगली मुंगी होणे, माणसाने चांगला, सुशील, सद्वर्तनी माणूस होणे म्हणजे यशस्वी परिपूर्ण जीवन होय.
घेतो म्हणे मी श्वास मोकळा
जीवन जगणे सुरूच आहे
ठाऊक नाही का कुणासाठी?
जिवंत असणे व्यर्थच आहे…
खरंय, श्वास घेणे सुरू आहे म्हणजे जीवन जगणे सुरू आहेच….परंतु आपण जो श्वास घेतो, जीवन जगतो ते का आणि कुणासाठी हेच स्वतःला ठाऊक नसेल तर जीवन जगणे व्यर्थच आहे.
जीवन ही एक माया आहे, खरे असे काहीच नाही…
आभास म्हणुनी कुणी पाही…आजन्म कुणी जीवना शोधत राही…
जीवन म्हणजे फुलपाखरू समजून कुणी आनंदे उडान भरतो…
स्वतःच्या मस्तीत जगून घेतो…का जन्म झाला हे सहज विसरतो…
चांगल्या अन् वाईट लोकांमधील जिंकण्या आणि हरण्याचा खेळ…कधी चांगली व्यक्ती जिंकते कधी वाईट…शेवटी जीवनचक्र सुरू राहणे आवश्यक असते. हार-जीत याचा विचार न करता माणूस जेव्हा जीवनातील खरी सुख दुःख शोधतो…स्वतःच्या सुखांपेक्षा इतरांची दुःख आपली वाटू लागतात, मनात दुसऱ्यांसाठी आत्मीयता, आपुलकी, प्रेम निर्माण होतं… दुसऱ्यांच्या दुःखामुळे आपले डोळे पाणावतात…अलगद गालावरून अश्रू ओघळतात… स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची उर्मी जागवतात… खऱ्या अर्थाने तेव्हाच जगण्याकडून माणसाचा जीवनाकडे प्रवास सुरु होतो…!
जगणे म्हणजे जीवन नाही…
व्याख्या सांगणे कठीण आहे…
कुणी म्हणतो मी आनंदी जगतो…
कुणी आनंदा शोधुनी पाहे…!
जीवनाचा अर्थ शोधण्या…कितिदा प्रसवले शब्द साहित्यात…परि न उमगला अर्थ जीवना…उगा हसवले मनास क्षणात… आनंदाचे लेवून लेणे कित्येक जगले स्वतःसाठी, कुणा न वाटले जगुया आनंद वाटण्या दुसऱ्यांसाठी…सुख भोगले, भोग भोगले…तोरण दारी श्रीमंती बांधले…गरिबांचे होते कुणा पडले…?
शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक वृद्धी होऊन माणूस आपल्यापुरता इतिहास, वर्तमान न बनता इतरांचे भविष्य होण्याचे स्वप्न पाहतो…तेव्हाच त्याचा प्रवास जीवनाकडे सुरू होतो…! आयुष्याचे गीत गात असाच सुखाकडून समाधानाकडे जीवनप्रवास सुरू राहो…!
माझे जीवन गाणे…माझे जीवन गाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे.
गात पुढे मज जाणे…माझे जीवन गाणे
©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६