सावंतवाडी :
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला असून १९८६ नंतर सदर कायदा हा आणखीन प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात आल्या आणि ग्राहकांना संरक्षण दिले गेले. मात्र तरीही ग्राहक राजा आपल्या हक्कांबाबत अजूनही उदासीन असून त्यासाठी ग्राहकांनी कायद्याने दिलेल्या अधिकारांचा सजगतेने व प्रभावीपणे वापर करुन आपली होणारी फसवणूक थांबवली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव व न्यायाधीश मा. डी. बी. म्हालटकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व पंचम खेमराज विधी महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरूवातीला चार्टर्ड अकाउंटंट व रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष श्री सुधीर नाईक यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व विशद केले. अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विधीज्ञ श्री नकुल पार्सेकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मीती मागचा इतीहास सविस्तर पणे मांडला तसेच आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात आपण कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करताना वस्तूची गुणवत्ता, मोजमाप, दर याबाबत सगळ्या बाबी पारखून खरेदी केली पाहिजे. तसेच मोठ्या प्रमाणात आॅनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होत असल्याने खबरदारी घेण्याबाबत सुतोवाच केले.
यावेळी सतत सात वर्षे ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचा अशासकीय सदस्य म्हणून काम करत असताना आलेले अनुभवही त्यांनी कथन केले. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या विधीज्ञ सौ. अश्विनी लेले यांनी आजच्या डिजीटल व ग्लोबल युगात ग्राहक न्यायालयाची गरज व जबाबदारी याबाबत माहिती दिली. तसेच ग्राहक मंचाची संरचना, अधिकार व कार्यपद्धती याबाबत तपशीलवार माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधीज्ञ सौ. पुजा जाधव नाईक यांनी केल. कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.