शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची हजेरी; अंदाजे एक कोटीची रक्कम खर्च होणार…
सावंतवाडी
सर्व पक्षीय तसेच विविध संघटनांकडून टीका झाल्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी प्रयत्न केले होते. तसेच माजी नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या कामासाठी तब्बल ५०-५० लाखाच्या अशा दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी होणार आहे.
मध्यंतरीच्या काळात येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात आली होती. परंतु चुकीच्या पद्धतीने कठड्याच्या बाजूने गाळ उपसा झाल्यामुळे “तो” कोसळला होता. त्यानंतर या कठड्याचे काम वेळेत करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु पावसाळा असल्याने व त्यानंतर आचारसंहिता असल्यामुळे हे काम रेंगाळले होते. याची निविदा प्रक्रिया २३ तारखेला झाल्याचे समजते. आता या कामाचा शुभारंभ होणार आहे.