You are currently viewing कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट

टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

चीनमधील कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्रसरकारने दक्षेतेच्या सूचना देताच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना नमुना चाचणीचे प्रमाण वाढविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घरोघरी सर्व्हे सुद्धा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी दिली व काळजी म्हणून शक्यतो सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरायला सुरुवात करावी, असे आवाहन केले आहे.

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होउ नये, यासाठी केंद्रसरकारने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कोरोना काळात उत्तम प्रकारे काम केले होते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले होते. आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नमुना चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जाणार असून घरोघरी आरोग्य सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. शासनाकडून नव्या सूचना प्राप्त होताच सर्व आरटीपिसीआर चाचणी केंद्रे सुरू आहेत. तसेच मास्क वापरणे सक्तीच्या सूचना आलेल्या नाहीत. मात्र, लवकरच तशा सूचना येऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनची लक्षणे दिसताच कुणीही हयगय न करता तात्काळ कोरोना नमुना चाचणी करून घेण्यात यावी, परदेशातून येणाऱ्या नागरिकाची माहिती देण्यात येऊन त्याचीही कोरोना चाचणी करून घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा