शासनमान्य रेशनधान्य दुकानामध्ये आड ठरणारी तांत्रिक अडचण दूर करण्याची केली मागणी
सावंतवाडी
सावंतवाडीचे नूतन तहसीलदार अरुण उंडे यांची सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी पदाधिकारी यांनी भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शासनमान्य रेशनधान्य दुकानामध्ये होणारें धान्य वाटप वेळेत व्हावे तसेच यासाठी आड ठरणारी तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी माजी शहराध्यक्ष आशिष शुभेदार यांच्यासह पदाधिकारी यांनी केली.
सावंतवाडी तहसीलदार पदी अरुण उंडे यांची प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून वर्षभरासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल मनसेच्या वतीने शुक्रवारी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या उंडे यांच्याशी मनसे पदाधिकारी यांनी विविध विषयावर चर्चा केली. तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून रेशन धान्य दुकानावर धान्य वाटप करण्यास काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. शासकीय धान्य देण्यासाठी वापरण्यात येणारी ई पॉस मशीन मध्ये सातत्याने रेंज तसेच सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवत असल्यामुळे रेशन दुकानावर ग्रामस्थांना ताटकळत उभे राहावे लागते. तालुक्यात पुरवठा विभागाचा कारभार सुरळीत व्हावा यात लक्ष घालण्यात यावे अशी मागणी माजी शहराध्यक्ष सुभेदार यांनी केली. तालुक्यात सध्या अनधिकृत कॉरी, खाणी ना परवानगी देण्याची कार्यवाही सुरु आहे. सध्या बहुतांशी ठिकाणी सुरु असलेले अनधिकृत कॉरी तसेच खाणीवर कारवाई केली जाऊन त्यांच्याकडून दंड वसूल केला जावा. विद्यार्थी तसेच शासकीय कामासाठी लागणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी एक खिडकी योजना सुरु केली जावी अशी मागणी पदाधिकारी यांनी केली. यावेळी माजी शहराध्यक्ष आशिष शुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, मनोज कांबळी, स्वप्नील कोठावळे, प्रशांत तळकर आदी उपस्थित होते