बांदा
फुकेरी येथील हनुमंत गडावर रविवार २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व तोफगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रथयात्रेचे बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर परिसर दणाणून गेला होता.सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जिर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा २५ डिसेंबर रोजी होणार आहे. याची जनमानसात जागृती व्हावी यासाठी दोडामार्गहून संपूर्ण जिल्हाभर रथयात्रा काढण्यात येणार आहे. दोडामार्गहून ही यात्रा आज सकाळी बांद्यात दाखल झाली.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रा. पं. सदस्य बाळू सावंत, प्रशांत बांदेकर, मकरंद तोरसकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर मांजरेकर, माजी सरपंच दीपक सावंत, म. गो. सावंत, ज्ञानेश्वर सावंत, कास सरपंच प्रविण पंडीत, सरमळे सरपंच विजय गावडे, सुभाष नाईक, निलेश देसाई, सुधीर शिरसाट, विकी कदम, एस. व्ही. नार्वेकर, बाबा गाड, संदेश महाले, हनुमंत सावंत, प्रवीण गाड आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांदा शिवप्रेमींकडून नवनिर्वाचित बांदा सरपंच प्रियांका नाईक, कास सरपंच प्रवीण पंडीत व सरमळे सरपंच विजय गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बांदा शहरातून ही रथयात्रा नेण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर ही रथयात्रा सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली.