*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*रावणोऽहम्।*
*मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठीलागी*
समर्थ रामदासांनी मनाच्या एका श्लोकात कितीतरी मोठा अर्थ सांगितलेला आहे. रावणाविषयी समर्थांनी दिलेल्या उदाहरणात सार्वभौमत्वाचे लयास जाण्याचे किती मार्मिक वर्णन अहंकारातून वासनेच्या अंगाने झालेले असल्याचे लक्षात येते.
रावणाविषयीची अनेक सद्गुणांची जंत्रीच आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्याच्या या सर्व सद्गुणांना छेद देणारा एकमेव दोष अहंकार हा त्याच्या नाशास कारणीभूत ठरला.
मातृभक्ती, शिवभक्ती, घोर तपश्चर्या, जिद्द, चिकाटी, अविश्रांत परिश्रम करण्याची त्याची वृत्ती, ज्ञान-विज्ञान, राजनीती या सर्व गोष्टींमध्ये निपुणता अशा अनेक गुणांनी संपन्न तर तो होताच. त्याने अनेक प्रकारची वरदानेही मिळवलेली होती. वरदानांच्या सहाय्याने तो सर्वशक्तीमान झाला होता. ज्यांच्याकडून वरदाने मिळवली त्यांच्यावरच कुरघोडी देखील करू लागला होता. विद्वत्ता आणि सामर्थ्य या दोन्हींच्या संयोगाने अहंकाराची निर्मिती झाली होती. विकारातून विकारांची निर्मिती यांचा क्रम सुरू होतो. तो थोपवणे मग शक्य होत नाही, याचा उत्तम नमुना रावण होता. पितृगणाकडून आर्य आणि मातुलगणाकडून अनार्य अशा मिश्र मिलापाच्या दोन भिन्न संस्कृतीतील त्याची उत्पत्ती होती. सुप्तावस्थेत असलेले अनेक विकार हळूहळू उफाळून वर येऊ लागले. मदोन्मत्त होऊन त्याने अनेक देवांवर चढाया केल्या. स्वबळावर वरदानांच्या सहाय्याने त्याने सुरूवातीला या सर्वच लढाया जिंकल्यासुद्धा! दिवसेंदिवस त्याचा मद वाढू लागला. त्याने ऋषीगणांना आणि सर्वसामान्यांना त्रास देऊन आपली दहशत पसरवण्याचे आरंभिले. तो आता स्वतःलाच देव समजू लागला होता. त्याला असं कळून चुकलं होतं की आपल्याला रोखू शकणारे आता कुणीच राहिले नाही. यादरम्यान त्याच्या अंगी असलेली सुप्त कामवासनाही उफाळून बाहेर आली होती. अनेक कुलीन स्त्रियांवर त्याची दृष्टी पडू लागली. अनेक स्त्रियांना त्याने स्वबळाने, स्वसामर्थ्याने वश करून घेतले. पण प्रत्येक स्त्री मात्र त्याला वश होऊ शकली नाही. खूप आटापिटा करूनसुद्धा त्याला काही वेळा निराश व्हावे लागले. शिवाय काहीजणींकडून मिळालेल्या शापांमुळे त्याच्या या वासनेवर काही प्रमाणात मर्यादाही आली. पण मूळची वासना त्याला काही शांत राहू देत नव्हती आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करून तो संकटं ओढवून घेत होता. यातील काही अनुभवांमुळे तो प्रत्येक वेळेला सावध होऊन नवीन परिणामकारक योजना तयार करीत असे. परंतु प्रत्येक वेळेला या योजना यशस्वी होत नव्हत्या. तरीही वासनेचा जोर त्याच्या एकूण सद्सद्विवेकबुद्धीवर आणि त्याच्या कुशाग्रबुद्धीवर मात करीत होता एवढे मात्र नक्कीच!
बलाने उन्मत्त झालेल्या अशा या रावणाचा अहंकार यापूर्वी अनेकांनी मोडलेला होताच. साक्षात शिवशंकरांनी त्याचा अहंकार उधळून लावला होता. त्यानंतर दशरथाबरोबरच्या युद्धात मिळवलेला निसटता विजय त्याला आव्हानात्मक चाहूल देऊन गेला होता. वालीसमोर त्याने पुरती शरणागती पत्करली होती. त्याने या द्वंद्वाचा इतका धसका घेतला की पुन्हा वानरांच्या वाटेलाच न जाण्याचे त्याने ठरवले. वालीबरोबर त्याने संधान साधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध तयार करून आपल्या राजनीतित्वाची उत्तम प्रचिती दिलेली होती. पण त्याच्या मनात मात्र आता हळूहळू एक असुरक्षिततेची भावना तयार होऊ लागली होती. या विश्वात आपण समजतो तसे आपणच फक्त सर्वशक्तीमान नाही तर आपल्याला थोपवू शकेल,अडवू शकेल असा कुणीतरी प्रतिस्पर्धी निर्माण होऊन आव्हान देऊ शकतो अशी अनाहूत भीती त्याला आतून वाटू लागली होती.
सर्वात प्रथम त्याने आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित केल्या. राज्यातील प्रजेला अत्यंत उत्तम प्रकारचे प्रशासन देऊन, या प्रजेवर सर्व सुखसुविधांचा भडिमार करून आपल्या बाजूने वळवून घेतले. उद्या कोणत्याही प्रसंगी प्रजेने आपल्याच बरोबर असले पाहिजे अशा प्रकारची एक संरचना त्याने स्वतःच्या राज्यात केली. लंकेत तर तो अगदी देवाप्रमाणे लोकांकडून गौरविला जाऊ लागला. अशा प्रकारे आपली प्रतिमा उंचावण्याचे सुनियोजन त्याने केले होते. या सर्वांमुळे त्याच्या अनैतिक मार्गाने मिळवलेल्या यशाला नैतिकतेचा मुलामा प्रजाजनांकडून आपसूकच मिळू लागला.
आर्यावर्तातील इतर राज्यांच्या आसपास असणाऱ्या वनक्षेत्रात त्याचा छुपा प्रभाव किंवा अंमल हा अनेक वर्षे सुरू होता. तेथे असणाऱ्या ऋषीगणांना, सामान्य लोकांना आणि नैतिकतेने वागणाऱ्या छोट्या छोट्या राज्यातील राजांना त्रास देण्याचे कारस्थान त्याच्या दूतांमार्फत आणि त्याने नेमलेल्या त्याच्या छुप्या अधिकाऱ्यांमार्फत चालू होते. त्या सर्वांनी मिळून त्याच्या साठी आवश्यक असणारी योग्य ती दहशत निर्माण करून शत्रूला मुळातूनच नष्ट करण्यासाठीची जी योजना होती, तिची धुरा व्यवस्थित सांभाळलेली होती. गुप्तचरांमार्फत सर्व घडामोडींवर तो लक्ष ठेवून असे. त्राटिकेच्या वधापासूनच तो रामाच्या एकूण हालचालींवर गुप्तहेरांमार्फत लक्ष ठेवूनच होता. रामाच्या आयुष्यात घडणार्या घटनाक्रमांमुळे कदाचित तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल की काय अशी भीती रावणाच्या मनात तेव्हाच निर्माण झालेली होती. वनवास काळातील उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारे रामाचे कूच त्याची चिंता वाढवणारे असेच होते. रामाच्या पुढील योजनेचा अंदाज घेण्यासाठीच त्याने आपली बहिण शूर्पणखा हिला हेर म्हणून पाठवले. गरज वाटली तर आपल्या बरोबरच्या चौदा सहस्र राक्षसगणांना बरोबर घेऊन आपल्या बंधूंच्या सहाय्याने तिथल्या तिथेच संभाव्य शत्रूचा बिमोड करावा अशी त्याची योजना होती. राम आणि लक्ष्मण यांनी मिळून खर, दूषण यांच्यासह चौदा सहस्र राक्षसांना मारले. ही वार्ता कळली तेव्हा तो पुरता कोलमडूनच गेला. तिथे जाऊन रामाशी युद्ध करणं शक्य नाही याची त्याला मनोमन खात्री पटली होती. आपल्या अमात्य आणि मंत्रिमंडळबैठकीत सुद्धा त्याने या गोष्टीवर निश्चितीकरण केलं होतं. जिंकण्याची शाश्वती नसलेलं युद्ध न करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केलेला होता. पण रावणाचा अहंकार त्याला शांत बसू देईना. शुर्पणखेकडून ऐकलेल्या सीतेच्या वर्णनामुळे आतून त्याची चलबिचल झाली होती. त्याची सुप्त वासना पुन्हा उफाळून बाहेर आली होती. सीतेला कोणत्याही प्रकारे वश करून किंवा बळजबरीने आपल्याकडे आणता आलं तर युद्ध न करता देखील रामाचा बिमोड केल्यासारखे होईल. त्या एकपत्नी रामाचे उट्टे काढून त्याला यातना देता येतील असा काहीतरी विचित्र विचार त्याच्या मनात आला. या सर्वांमागे अहंकार आणि त्याची वासना याबरोबरच खुमखुमीसुद्धा कारणीभूत होती. कामवासनेने उद्युक्त होऊन त्याने सीतेचे कपटाने हरण केले पण इथेच त्याने स्वतःच्या नाशाची बीजे खऱ्या अर्थाने रोवली. युद्धात पराभव जरी झाला असता तरी तो त्याच्या लौकिकाला साजेसाच ठरला असता. राम आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही, एवढा मोठा समुद्र उल्लंघून येणे त्याला शक्य होणार नाही. ठावठिकाणा कळूनही तो काहीही करू शकत नाही. त्याच्या कोणीही सहाय्याला नाही अशी सर्व माहिती रावणाकडे असल्यामुळे रावण काही प्रमाणात निश्चिंत होता. सीतेला तो कोणत्याही प्रकारे वश करून घेऊ शकत होता अशी त्याला मनोमन खात्री होती.
‘कामातुराणां न भयं न लज्जा।’ भय, लज्जा आणि बरोबरीनेच विवेकही कामवासना नष्ट करते हेच खरे. ज्या सीतेला त्याने पळवून आणले होते ती त्याला काही केल्या वश होत नव्हती. इकडे राम सुग्रीवाशी मैत्री करून वानरांच्या मदतीने सेतू बांधून लंकेपर्यंत पोहचलासुद्धा. हनुमानाने लंकादहन करून रामाच्या सामर्थ्याची चुणूक दाखवलेली होतीच. वासने बरोबर अहंकाराचेसुद्धा प्राबल्य वाढलेले असल्यामुळे आता रावणदेखील माघार घेण्यास तयार नव्हता. तो मनातून खरं तर पुरता घाबरलेला होता. वानरांना समोर पाहून तर तो पूर्वानुभवामुळे आणखीच गर्भगळीत झाला होता. पण त्याच्या प्रजाजनांसमोर मात्र आता त्याला एका उत्तम राजाची, लढवय्या राजाची प्रतिमा काळवंडू द्यायची नव्हती. युद्धात पराजय निश्चित असतानासुद्धा केवळ आपल्या अहंकारापोटी त्याने आपल्या सर्व सैन्याला आणि प्रजाजनांना देखील वेठीस धरले. अंगदशिष्टाई सुद्धा त्याने अमान्य करत युद्धाला सामोरे जाण्याचे ठरवले. विभिषणाला राज्यातून हाकलून दिले. विनाशकाले विपरित बुद्धी! असाच तो वागू लागला. युद्धकाळामध्ये त्याने पराक्रमाची शर्थ केली. इतर सैन्याबरोबरच मेघनादासह सर्व पुत्र, कुंभकर्णासारखा भाऊ या सगळ्यांची त्याने आहुती दिली आणि शेवटी स्वतः सुद्धा रामाच्या बाणाने विद्ध होऊन मरणासन्न झाला. एका अहंकाराचा, मदाचा, वासनांधतेचा अंत झाला. सर्वशक्तीमानाला नर-वानरांनी मिळून परास्त केले. सद्गुणसामर्थ्याचा पुतळा वासनाहंकारामुळे छिन्नविच्छिन्न झाला होता.
आजच्या काळातही हा रावण आपल्याला अवतीभवती वृत्तीच्या रुपाने अनेक जणांमध्ये वावरताना दिसतो. रामराज्य हा जरी आज एक आदर्शवाद असला तरी रावण मात्र आपल्या अवतीभवती अजूनही वावरतो आहे. प्रत्येक वेळेला राम येईलच असे नाही. कधीकधी हा रावण स्वतःच स्वतःचा नाश ओढवून घेताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून रावणवृत्तीचा समूळ नाश व्हायला हवा. त्यासाठी आपण आपल्या आध्यात्मिक बळाने रामाला आतून जागृत केले पाहिजे. आणि या रावणाला थोपविले पाहिजे.
शुभं भवतु।
—हेमंत श्रीपाद कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.