*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे ज्येष्ठ लेखक कवी माधव ग. सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धन्यता*
********
जरी मला काही कळत नसले तरीही
मी साऱ्या साऱ्यांना ओळखून आहे
जगताना विसरावे असे काही नसते
जगलेला प्रत्येक क्षण मी स्मरतो आहे…
लपंडाव तो निसर्गाचा मीही खेळलो
त्या क्षणांचे मोहोळ घोंगावते आहे
नेत्री आनंद दुःखाचे आजही पाझर
ते आजही मी सुखाने झेलतो आहे….
सोबतीला माझ्या आकाश चांदण्यांचे
नीरवतेत मीच स्वतःस शोधतो आहे
अंतरी ऋतु संवेदनाचे सप्तरंगलेले
त्या संवेदनांना मी कुरवाळतो आहे….
जग सारे सारे एकमेकांत गुंतलेले
कां ? हा प्रश्न मात्र भेडसावतो आहे
आज भासते सारेच निष्प्रभ निर्जीव
अशा जीवनाचा अर्थ शोधतो आहे…
धन्यता जीवनी हा जन्मच मानवाचा
लोंढयातही मी माणूस हुडकतो आहे
दिंडितुनी थिरकता वैष्णवांची पाऊले
निर्मळ गळाभेटित माणूस दिसतो आहे…
******************************
*रचना क्र. ३४१/२० / १२ /२०२२*
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 976654908 )*