आपतकालीन परिस्थितीत अचूक निर्णयक्षमता महत्वाची-: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
आपत्कालीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये जलद योग्य प्रतिसाद देण्याच्या दृष्टीकोनातून अचूक निर्णयक्षमता अत्यंत महत्त्वाची असते. सामाजिक बांधिलकी म्हणून सदैव उपयुक्त असणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी तयार रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आयोजीत कुडाळ येथील आर.एस.एन हॉटेलच्या सभागृहात ‘आपदा मित्र ‘ प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23चे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोकणपट्टा हा आपत्ती पट्टा म्हणून ओळखला जातो. निसर्ग, तौक्ते यासारखी चक्री वादळे,दरडी कोसळणे,महापूर अशा आपत्तींना तोंड द्यावे लागले.वादळांसारख्या व अतिवृष्टींची पूर्वसूचना मिळत असल्याने पूर्वतयारी करुन जिवीत हानी टाळता येवू शकते. परंतु अचानक उद्भवणाऱ्या आपत्तींमध्ये अचूक निर्णय क्षमता असावी लागते. जलद प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग होतो. अशा प्रशिक्षणामुळे छोटी आपत्ती उग्र रुप धारण करण्यापूर्वीच निवारता येवू शकते.
सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची मदत करताना स्वत:लाही सुरक्षित ठेवले पाहिजे, त्यासाठी निरोगी शरीर, प्रचंड आत्मविश्वास आणि उत्तम मानसिक क्षमता विकसित करायला अशा प्रशिक्षणांचा निश्चित उपयोग होतो. आपण ज्या परिसरात राहतो. त्या परिसारातील अन्न, धान्यांचा आहारात समावेश हवा. मानवसेवा ही ईश्वरसेवा आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सदैव तयार असायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षणामागील हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सदैव तयार असते. परंतु, काही वेळेला पूर्वसूचना न मिळणाऱ्या आपत्ती असतात. उदाहरणार्थ दरडी कोसळणे, अपघात, भूकंप अशा ठिकाणी प्रशासन पोहचण्याआधी स्थानिक तरुण मदतीसाठी धाव घेतात. या तरुणांना जर प्रशिक्षण दिले, तर निश्चितपणे योग्य पध्दतीने आपत्तीचे निवारण होवू शकते. परिणामी जिवीत हानी टाळता येवू शकते. अशा प्रशिक्षणासाठी अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे.
नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे म्हणाले, छोट्या-छोट्या तंत्राचा वापर केल्यास संकटातून बाहेर काढण्यास मदत होवू शकते. बऱ्याच वेळेला आगीच्या ठिकाणी अग्नीशमन यंत्र असते परंतु ते कसे चालवायचे हे माहीत नसते. त्यासाठी अशा प्रशिक्षणाचा उपयोग होतो.
कोल्हापूर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा या जिल्ह्याचे निरिक्षक प्रसाद संकपाळ म्हणाले, ‘आपदा मित्र ‘ कार्यक्रम हा देशात सर्व प्रथम कोल्हापूरमध्ये सुरु झाला. याची दखल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. जी येणारी आपत्ती आहे, ती निवारण्यासाठी त्यागावातील त्याच भागातील लोक तयार असतील तर त्या आपत्तीची तीव्रता कमी करता येईल, हाच या आपदा मित्र कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी ‘आपदा मित्र ‘ प्रशिक्षण कार्यक्रम साहित्याचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी स्वागत सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्ह्यातून शंभर ‘आपदा मित्र ‘ उपस्थित होते.