सिंधुदुर्गनगरी
मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबतचे परिपत्रक शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने 15 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द केले आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली.
या शासन परिपत्रकात म्हटले आहे, आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग-2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था, आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते,जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दि. 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमणे आदेश देण्यात येत आहेत.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.).
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.