सावंतवाडी
मळगाव येथील भागवत गुरुजी यांच्या दत्तमंदिर प्रांगणात कल्पवृक्ष शेतकरी गटाचा कुटुंब मेळावा पार पडला. एकत्र कुटुंब राहणारे, पारंपरिक बियाणे संवर्धन करणारे शेतकरी व वैदू यांचा यावेळी सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख व्हावी व कामातील आपलेपणा वाढावा यासाठी कल्पवृक्ष गटातील सदस्यांनी हा कुटुंब मेळावा आयोजित केला होता. २०१५ पासून आजपर्यंत गटाने श्री पध्दतीने भातशेती, बेबीकॉर्न, मुरघास, गांडूळ खत, शेतकरी अभ्यासदौरा, देशी बी संवर्धन, शालेय मुलांसोबत वृक्षारोपण, दूध संकलन केंद्र, ‘गोकुळ’ चे दूध शीतकरण केंद्र (बीएमसी ) असा कार्यविस्तार केला, याची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.
काळानुसार महिलांना वेळ काढून नवीन ज्ञान घ्यावे लागेल, असे अपर्णा खानोलकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले. तरुण पिढीने शेती सोबत प्रक्रिया उद्योगाकडे वळावे यासाठी डॉ. हेडगेवार प्रकल्प मार्गदर्शन व सहकार्य करेल, असे आवाहन प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे यांनी केले. गटाच्या सदस्यांनी दूध वाढीबरोबर गुणवत्ता याविषयी अधिक जागरूकता दाखवावी”, अशी अपेक्षा यावेळी गटाचे अध्यक्ष संतोष सामंत यांनी व्यक्त केली. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य मिळण्यासाठी कायदा झाला, पाहिजे यासाठी १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे भारतीय किसान संघाने किसान गर्जना रॅली आयोजित केली आहे. अशी माहिती जिल्हामंत्री श्री अभय भिडे यांनी यावेळी दिली. कोणताही वेगळा हेतू न ठेवता गटातील सदस्यांनी एकत्र येत केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे मत समारोपीय भाषणात रा. स्व. संघ समरसता गतीविधीचे जिल्हा प्रमुख सुरेश कामत यांनी व्यक्त केले.
एकत्र कुटुंब राहणारे, पारंपरिक बियाणे संवर्धन करणारे वैदू म्हणून गावातील लोकांना सेवा देणाऱ्या दाजी राणे, बाळू पेडणेकर, सुरेश हरमलकर, तात्या लाखे, रेखाताई पडवळ यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद पंतवालावलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.