You are currently viewing मित्रहो

मित्रहो

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

मित्रहो ,
मुळात लेखन साहित्य हे वैश्विक आहे म्हणजे जगातील सर्वच भाषामध्ये आहे. प्रत्येक मानवी जीवाच्या संवेदनांची आत्मिक परिभाषा ही सारखी आहे. सुख , दुःख , वेदना, आनंद , चिंता , भय , भीती , प्रीती , श्रद्धा , भक्ती , आसक्ती , मुक्ती ,अशा अनेक मानवी मनांच्या कंगोऱ्यांची स्पंदने , त्यांची उलघाल ही सारखीच असते. विवेकी संयमावर त्याची तीव्रता असते. पण या संवेदना व्यक्त करताना अंतरमनातून जेंव्हा वैचारिक शब्दभावनाक्षरातून त्या जेंव्हा व्यक्त होतात तेंव्हा त्या कल्लोळी मनभावनांचा आशयघन आणी काळजाला छेदून जाणारे मुक्त वास्तव विवेचन असते तेच खरे वांगमयीन लेखन , काव्य रचना अक्षरबद्ध होते तेच साहित्य असते. प्रत्येक मनभावनांचे ते प्रतिबिंब असते आणी ते सत्यार्थी असल्यामुळे सर्वार्थाने सुंदर असते. नैसर्गिक मुक्त सळसळणारी वीज असो , घोंगावणारा धुंद पवन असो , किंवा उंच कडेकपारीतून दऱ्याखोऱ्यातून संथ ,अवखळ खळखळणारी सरिता असो , गगनी झेपावणाऱ्या बेभान सागर लाटा किंवा सागराची गाज असो, किंवा मुक्त बेधुंद बरसणारी वर्षा असो , साऱ्या पंचमहाभूतांनी भारलेला निसर्ग असो .. प्रत्येकाला एक विलक्षण नाद आहे , ताल आहे , लय आहे , अर्थ आहे. बेबंधी मुक्तता आहे. तदवतच लेखन साहित्याचं मुक्त स्वरूप आहे. ते मुक्त आहे , बेबंध आहे , वैश्विक आहे. ब्रह्मांडातील सारे सोहळे पहा , अंबरातील घनमेघ पहा यांना कुठल्याच चौकटीचे आकृतिबंध नाहीत तरीही विलोभनीय सुंदर आहेत ती ईश्वरीय कृपा आहे .
साहित्य लेखनाला लिखित नियम आहेत हे निर्विवाद , ते पाळावेतही त्याचा विचारही जरूर करावा या बद्दल दुमत नाही. पण ते कटाक्षाने पाळावेत असा आग्रह असू नये . कारण लेखन हे मुक्त स्वातंत्र्य आहे . फक्त साहित्य संस्कारमूल्य , त्यातील भावशब्दांची शालीनता पवित्रता ही आग्रही तत्वाने जपली पाहिजे .
साहित्याला विषयाचे बंधन नाही. मुक्त लिहावे. प्रबोधनात्मक वास्तव लिहावे .
साहित्य , ग्रंथ वाचन मानवी जीवनला आत्ममुख करून समृद्ध करते. म्हणून तर प्राचीन ग्रंथसंपदांची समाजात पारायणे होत असतात . हे आपणां सर्वाना माहिती आहे .
साहित्यातील अर्थपूर्ण , कल्याणकारी कृपाळू शब्दभावनांना कुठल्याही चौकटी बंधनाची तमा नसते . अंत:करणाला मृदुल स्पर्श करणारे अर्थपूर्ण प्रबोधनात्मक शब्दभावबंध हेच उत्तम साहित्याचे महत्वाचे निकष असतात .
असे मला वाटते.
मी नवोदित किंवा प्रस्थापित साहित्यिक असा भेद करू इच्छित नाही. नवोदितही सुंदर लिहितात , पण नवोदितांनीही वाचन ,चिंतन , मनन , करून लिहिले पाहिजे हे तितकेच खरे.
कारण साहित्य लेखन ही तपश्चर्या आहे. ती केल्यावरच सरस्वतीचा वरदहस्त लाभतो ..!
याचा विसर पडू देवू नये.
इती लेखन सीमा..

*वि.ग.सातपुते पुणे*
( *9766544908* )

 

प्रतिक्रिया व्यक्त करा