शिवसेना नेते सतिश सावंत यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कणकवली
कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील आधारकेंद्रे सुरु नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील आधारकेंद्रे त्वरीत सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना नेते,जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीत बंद झालेली आधारकार्ड सेवा केंद्रे अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शासकीय सेवा, दाखले, बँका आदींसाठी तसेच वैयक्तिक कामासाठी महत्वपूर्ण ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड देता येत नाहीत. त्यामुळे वयोवृध्द नागरीक, शाळेतील मुले याना कोरोना महामारीमुळे मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे . त्यामुळे कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील आधारकेंद्रे त्वरीत सुरू करावीत . तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.