*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*जीवनस्पर्श*
रस, रूप, गंध, नाद आणि स्पर्श हे पंचेंद्रियांनी अनुभवास येणारे परिणाम! जन्मापासूनच दृकश्राव्य माध्यमातून आपण सर्व शिकत असतो. रसना आणि घ्राणेंद्रिय थोडे उशिरा विकसित होतात. स्पर्शाची ओळख मात्र आपल्याला जन्मापूर्वीपासून आणि नंतरही आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देतच असते.
गर्भात असल्यापासून आईचा स्पर्श अनुभवणारं ते अर्भक जन्मल्यानंतर आईच्या पहिल्या स्पर्शाने सुरक्षिततेचा अनुभव घेतं. अवतीभवतीच्या आपल्या माणसांच्या स्पर्शाने त्याचं अनुभवविश्व समृद्ध होत असतं. थोपटणे, कुरवाळणे, मुके घेणे अशा स्पर्शातूनच त्याला प्रेमाची जाणीव होते. बाबांचं बोट धरून शाळेत जाताना भक्कम आधार जाणवतो. शिक्षकांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन देते तर कधीकधी रागाने घातलेला धपाटा चूक लक्षात आणून देतो. मित्रांनी मारलेल्या टपल्या खेळीमेळीचं वातावरण निर्माण करतात. नव्या कपड्यांचे नऊ गुच्चे आनंदाला वेदनेची किनार देतात. शिवाशिवी असो की धपाधपी, यातला स्पर्श पकडलो गेल्याची जाणीव करून देतो तर कबड्डीतला स्पर्श जिंकण्यातला आनंद तर कधी हरण्यातलं दुःख पचवायला शिकवतो.
पौगंडावस्थेतील ‘त्या’ ओझरत्या स्पर्शाने सुद्धा मनात उकळ्या फुटतात. कधीकधी नकोसा स्पर्श मनाची घुसमटसुद्धा वाढवतो. मित्र-मैत्रिणींचा खांद्यावरचा हात आश्वासकतेचा अनुभव देऊन जातो. प्रियकर-प्रेयसीने हातात हात घेऊन घेतलेल्या आणाभाका विश्वासाचं नातं निर्माण करतात. लग्नातलं पाणिग्रहण आयुष्याला एका नव्या वळणावर घेऊन जातं.
दोन शरीरांच्या मिलनाचा स्पर्श अभिन्नतेचं द्योतक ठरतो. आलिंगनाची हवीहवीशी वाटणारी बेडी संसारयात्रेत गुरफटवते. आई-वडिलांच्या किंवा मोठ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श केल्याने लहान असल्याची जाणीव होते. आशीर्वादासाठी मस्तकावर ठेवलेला हात शुभचिंतनाची ग्वाही देतो.
हे तर फक्त माणसांचं झालं! पक्षी, प्राणी यांना सुद्धा स्पर्शातली उब, माया, आपुलकी, वात्सल्य कळत असतं. पाळीव प्राण्यांचंच काय, प्रकाश आमटे यांनी हिंस्र प्राण्यांना देखील स्पर्शातून माणसाळवलेलं आपल्याला हेमलकसा येथे पहावयास मिळतं. निसर्गातही स्पर्श भरून राहिलेला आहे. सूर्यकिरणांचा उगवल्यापासून मावळेपर्यंतचा स्पर्श उष्णतेचे चढ-उतार शिकवतो. वाऱ्याची झुळूक आल्हाददायक वाटते तर सोसाट्याचा वारा भीती निर्माण करतो. विहीर, नदी, तलाव, सरोवर, समुद्र यातील प्रत्येक पाण्याच्या स्पर्शाची अनुभूती वेगवेगळी असते.
घरातील प्रत्येक वस्तूला असलेला मायेचा स्पर्श वास्तूसुखाची आणि स्वामित्वाची भावना निर्माण करतो. थोडक्यात स्पर्श हे ज्ञानाचे एक अतिशय उत्तम माध्यम आहे. दृष्टिहीन व्यक्ती या स्पर्शाच्या माध्यमातून शिकत-शिकत दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडताना आपण पाहतोच! मनाला सुखावणारा मनस्पर्श, भावनांनी ओतप्रोत असा भावस्पर्श, असे कितीतरी स्पर्श हे वर्णनातीत आहेत.
स्पर्शातून सुरू झालेला हा जीवनप्रवास मृत्यूनंतरच्या काकस्पर्शाने पूर्ण व्हावा यातच स्पर्शाचं महात्म्य सामावलेलं आहे.
— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई