You are currently viewing स्पर्श…..

स्पर्श…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्पर्श…..*

स्पर्श होता तुझा हृदयात ये प्राण रे
स्पंदने होती सुरू ठोक्यात निर्माण रे
किमया अशी तुझी फुलती फुले फुले
तृणपाती डोलती दंव सोनेरी झुले ….

मोहोरती रे तरू कोकीळेस कंठ तो
तव स्पर्शाने पहा आंबा ही मोहोरतो
बांधावरी पहा डोलती माड किती
तरंग त्या लहरी सरितेवरी किती…

सागरही गर्जतो गाज ये काठावरी
फेसाळती लाटा त्या रोजच उंचावरी
स्पर्शातून किमया भुंगा परागात
स्पर्शता माती बीजा उमले अंधारात ….

माती वारा नि पाणी स्पर्शता टरारते
डोकावती बाहेरी आकाशी ते धावते
मुळे माती नि पाणी आजोबा वड होती
झुल्यात झाडावरी रोजच गाणी गाती…

मातेच्या कोणत्याही स्पर्शात ये जीवन
छातीशी धरताच मायचं त्रिभुवन
स्पर्शात थरार तो वीजच चमकते
लाजती लोचने नि भूमीस न्यहाळते…

सृजन स्पर्शातून बहर ये वेलीस
दाण्यातूनी एका उपजते कणीस
उजाड स्पर्शावीना जीवन असंभव
मायेचा फिरता हात तरून जाती”भव”….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४/१२/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा