You are currently viewing प्रा. उदय खानोलकर म्हणजे अफाट ज्ञानाचा सागर : संजय पुनाळेकर

प्रा. उदय खानोलकर म्हणजे अफाट ज्ञानाचा सागर : संजय पुनाळेकर

वाचन मंदिराला योग्य माणसाचं नाव देऊन केला सन्मान

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांच्या जयंती कार्यक्रमात स्मृतींना उजाळा

सावंतवाडी

कै. प्रा. उदय खानोलकर यांच्यासारख्या माणसाचा सहवास लाभणं हे देखील मोठं भाग्य होतं. उदय सारखी माणसं विरळाचं. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. जगात अनेक बुद्धीवादी तसेच प्रज्ञावंत माणसं असतील. मात्र, उदय हा सर्वाहून वेगळाच होता. तो अत्यंत बुद्धिमान होताच पण तेवढाच तो लीन होता. पुस्तक हेच त्याचं आयुष्य होतं तर वाचन हा त्याचा श्वास होता. उदय हा अफाट ज्ञानाचा सागर होता. त्यामूळे मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराला उदय सारख्या योग्य माणसाचं नाव देऊन वाचनालयाचा सन्मानच वाढवला, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा कलावलय नाट्य संस्थेचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले.

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे स्व. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा जयंती कार्यक्रम वाचन मंदिराच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय पुनाळेकर हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर, वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद बांदेकर, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक नंदकुमार प्रभू देसाई, कै. उदय खानोलकर यांचे बंधु महेश खानोलकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रविंद्रनाथ कांबळी, ॲड. डी. के. गांवकर, प्रा. राजू बांदेकर, चंद्रकांत जाधव यांसह संचालक मंडळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उदयचे सहकारी प्राध्यापक डॉ. आनंद बांदेकर म्हणाले, उदय हा कोणलाच समजलेलाच नाही. कारण उदय हा उदयचं होता. उदय म्हणजे ज्ञानाचं व पुस्तकांचं भांडार होतं. तासंतास लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचणं हाच त्याचा दिनक्रम होता. रिकाम्या वेळेचा उपयोग तो केवळ आणि केवळ पुस्तक वाचण्यासाठीच करायचा. केवळ वाचनचं नव्हे तर कथा कादंबरी साहित्य कविता यांच्या वाचनानंतर त्याची समीक्षा कशा करायची हे उदय कडून शिकावं, अशा शब्दांत डॉ. बांदेकर यांनी कै. उदय खानोलकर यांच्या स्मृती जागवल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर पाडगांवकर यांनी आपल्या मनोगतात कै. प्रा. उदय खानोलकर यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. उदय हे मळगांवचे भूषण होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी मांडलेले शब्द, त्यांच्या स्मृती येथील चराचरात भरून उरल्या आहेत. ज्या प्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या नावाने आळंदी ओळखली जाते. त्याचप्रमाणे साहित्यिक क्षेत्रात कै. उदय खानोलकर यांचं समाधीस्थळ म्हणून हे वाचनमंदिर ओळखलं जाईल, अशा शब्दात पाडगावकर यांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.

तर सोशल मीडियाच्या आजच्या जगात युवावर्ग इंटरनेटकडे वळलेला असताना त्यांना पुन्हा एकदा पुस्तक वाचनाकडे आणण्याचे काम वाचनालयांनाच करायच आहे. आपलं हे कै. उदय खानोलकर वाचन मंदिर हे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहे. त्यासाठीच वाचनालयाला लागेल ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उदय यांचे बंधू महेश खानोलकर यांनी यावेळी दिली.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक नंदकुमार प्रभू देसाई, ॲड. डी.के. गांवकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रविंद्रनाथ कांबळी, चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य उदय प्रेमींनी उद्याच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन मंदिर चे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी केले. यावेळी त्यांनी वाचन मंदिराच्या एकंदरीत वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. राजू बांदेकर तर आभार सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले. यावेळी कै. उदय खानोलकर प्रेमी, ग्रंथ प्रेमी, ग्रंथालयीन वाचक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा