*वक्रतुंड साहित्य समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.सतीश शिरसाठ यांनी “माचीवरला बुधा” या गो. नि. दांडेकर यांच्या पुस्तकाचा दिलेला परिचय*
*माचीवरला बुधा* (पुस्तक परिचय)
आवतीभोवतीच्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण, ओघवत्या भाषेत त्यांचे केलेले वर्णन, पूर्ण कथेचे,त्यातील निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे वर्णन करताना,वापरलेल्या भाषेतील प्रवाहीपणा, आयुष्यभर महाराष्ट्रात केलेल्या भटकंतीतून तिथले जीवन टिपकागदाप्रमाणे टिपण्याची संवेदनशीलता, स्थानिक बोलीचा लहेजा अचूकपणे मांडण्याची किमया गो.नि.दांडेकर यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून दिसून येते. ‘गोनिदा’ या नावाने अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो.गोनिदा जिथं गेले,तिथल्या निसर्गाशी आणि माणसांशी त्यांनी संवाद साधला.तो कागदावर उतरवला; परिणामी उत्तम साहित्यकृती निर्माण झाली.मला आठवतं,मी ओतूर काॅलेजमध्ये शिकत होतो; तेव्हा गोनिदांचं भाषण ऐकण्याचा योग आला.पूर्वी त्यांची बरीच पुस्तकं वाचली होती.त्यावरून जो अंदाज बांधला होता तो सपशेल खोटा ठरला. सर्वसाधारण अंगकाठीचे गोनिदा,आपलं म्हणणं शांतपणे मांडत होते.भाषण संपल्यावर त्यांनी जवळच्या हरिश्चंद्र गडावर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
गोनिदांची’ माचीवरला बुधा’ ही कादंबरी मी अनेक वेळा वाचली होती.तरीपण ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटली.त्या कादंबरीचा परिचय;
बुधा एक सर्वसामान्य म्हातारा आदिवासी माणूस.
मूळाचा राजमाचीजवळच्या टेमलाईच्या पठारावरचा रहाणारा . त्याचे लहानपण गावी खूप आनंदात गेले होते.तरुणपणी कामासाठी मुंबईत येतो.आणि पुढे मुलांसोबत मुंबईत राहू लागतो.पण त्याचं इथल्या शहरी वातावरणात मन रमत नाही.समोरच्या चाळीत रहाणारी एक म्हातारी त्याला याबाबत विचारते.असं काही नाही हे बुधा तिला सांगतो.मात्र ती आपल्या भावाला बुधाच्या या अस्वस्थेविषयी सांगते.तो बुधाच्या मुलाला फैलावर घेतो.चाळीतली इतर माणसंही भिवाला बुधाच्या
तब्येतीची नीट काळजी घ्यायला सांगतात. या वेळी मात्र बुधा आपले मत सांगतो.तो म्हणतो,” मला काईबी झालं न्हाई. चांगला खातो- पितो. समदं नीट निरातीनं चालू हाये.पर पर मला हितं आन्न गोड
लाग S ना झालं !” आणि तो परत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतो. मुंबईतील बेगडी आणि स्वार्थी जीवनापेक्षा गावचे जीवन किती निर्मळ आहे तिथे जाऊन परत आपले साम्राज्य उभे करू असं वाटून तो गावी जातो.कथा सुरू होते,तेव्हा बुधा मुंबईहून गावी येतो तिथून. रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्यानंतरच्या आकाशातील निसर्गाचे वर्णन करतानाचे लेखकाचे शब्द किती सुंदर आहेत- ‘ ‘त्याचवेळी खंडाळ्याच्या अंगानं आठदहा ढगही तरंगत लोणावळ्यावर आले,पण ते काही थांबले नाहीत.पुढे पुढे चालते झाले.पिंजत पिंजत, आकार बदलीत ते पांगले.’
टेमलाईच्या पठारावर तिथल्या लोकांच्या मदतीने त्याने रहाण्यासाठी एक झोपडी तयार करून आपल्या वडिलोपार्जित शेतीत तो घाम गाळू लागला. तो आपला स्वयंपाकही हाताने करू लागला.
त्याच्या दिनचर्येविषयी
लेखक लिहीतात, ‘एखाद्या बाजाराला लोणावळ्याला जाऊन बुधा तांदूळ,दाळ, तंबाखू,बोंबील, मिठमिरची आणायचा,अन् दुसर्या दिवशी पुन्हा कु-हाड कुदळी घेऊन कामाला भिडायचा’.
बुधा आनंदात रहात होता.एक दिवस अचानक भिवा त्याच्याकडं येऊन मुंबईला परतायला विनवू लागला.भिवाच्या बायकोने “सास-याला मुंबईला परत घेऊन या ” असा हट्ट धरला होता,हे भिवाने बुधाला सांगितलं.मात्र त्यामागचं कारण वेगळं होतं.भिवाची बायको एका बाईसोबत महिलांच्या जागृतीसाठी घराबाहेर जाणार होती.तेव्हा घरी कुणीतरी राखणदार पाहिजे हा तिचा उद्देश होता.हा तिचा अंतस्थ हेतू समजल्यावर बुधाची मनस्थिती वर्णन करताना लेखक म्हणतात, ” त्याला एकच गोष्ट खुपत होती.सूनबाईला’ जागर्ति ‘करण्यासाठी रोज दुपारी बाहेर जावं लागतं.कुण्या बॅन्केतल्या येवल्याच्या बायकोबरोबर. घरी कुणी राखणदार हवा.म्हणून तिनं सास-याला आणायचा नव-यापाशी हट्ट धरला आहे.एवढं एकच वाक्य त्याच्या डोक्यात घुमत राहिलं.कड्याच्या पोटाशी घुबडाचा आवाज घुमतो तसं”. बुधानं मुंबईला परतण्याचा मुलाचा प्रस्ताव ठोकरून इथल्या माणसांशी आणि निसर्गाशी आपण रममाण झाल्याचे सांगितले.इथला निसर्ग निरपेक्षपणे किती भरभरून देतो ,त्या तुलनेने मुंबईच्या जीवनातील बेगडीपणा आणि माणसांचा स्वार्थ याविषयी बुधा म्हणतो,” मुंबईच्या माणसांना काय करीतोस ! आरं ,कुनीबी कामाला यायचा न्हाई! पैका हाये,तवर समदे बुधादा बुधादा करतील. त्यो सपल्याबरूबर कुनी वळखबी लावायचा न्हाई…”बुधा आपल्या शेतात मनापासून काम करत जगत असतो.तिथल्या निसर्गाशी तो जवळीक साधतो.एकाकीपणा जाणवू नये म्हणून कुत्रा आणि बक-या पाळतो.आसपासच्या चिमण्या, खारी यांच्यासोबत संवाद साधतो.त्यांना खायला घालतो.एक दिवस पठाराखाली मिलिट्रीच्या लोकांचा कॅम्प येतो.सात दिवसानंतर ते जातात. बुधा त्या घटनेने अस्वस्थ होतो.या घटनेचे वर्णन करताना,लेखक म्हणतात, “सात दिवस भुर्रदिशी उडून गेले,अन् आठव्या दिवशी संध्याकाळी हे लष्करी जवान आपल्या राहुट्या पाडू लागले.गुंडाळू लागले… त्यांनी बुधाचा निरोप घेतला नाही.त्याला जातो म्हणून सांगितलं नाही…म्हातारा बुधा नांदुरकीशेजारी उभा राहून उदासवाणा होऊन एकटाच हात हलवीत राहिला…म्हाता-या बुधाचं हात हलवणं फोल झालं…त्याच्या जीवनातल्या आनंदात भस्सदिशी भला थोरला खळगा पडला”. आणखी एक घटना घडली; त्यामुळे तो खचून गेला.रोज नित्यनेमाने एक विमान जाताना तो पहात होता.आज तेही दिसलं नाही की,त्याचा आवाज ऐकू आला नाही.त्याने आपला सगळा राग पाळलेल्या कुत्र्यावर काढला.त्याने कुत्र्याच्या पाठीत रट्टा घातला.दिवसभर आणि रात्रीही तो जेवला नाही.स्वत:साठी केलेला भात त्याने कुत्र्याला दिला.पण त्यानेही भाताला तोंड लावले नाही.बक-यांनाही त्याने काहीच खायला दिलं नाही. उदासपणे तो लवकरच झोपी गेला. रात्री कुत्र्याच्या भुंकण्याने तो जागा झाला.उठून तो कुत्र्यावर खेकसला.बाहेर त्याने पाहिलं तर काहीच दिसलं नाही.त्याने कुत्र्याला झोपडीत बोलावलं.मात्र कुत्रा
बाहेर जाऊन भुंकत राहिला.क्षणभर त्याचं केकाटलं ऐकू आलं आणि थांबलं. बुधानं बाहेर येऊन कुत्र्याला खूप हाका मारल्या. पण कुत्रा आलाच नाही.काय झालं असेल हे त्याने ओळखले.पहाटे त्याला एका बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याचं दिसलं . इथल्या वास्तव्यात सतत साथ देणा-या कुत्र्याच्या निधनाला आपणच जबाबदार आहोत असं त्याला वाटलं आणि तो खचून गेला.एकदा त्याच्या मनात आलं की,
इथलं रहाणं सोडून परत मुंबईला परतावं.पण तो विचार त्याने मनातून काढून टाकला. आणि आपली कामं तो यंत्रवत करू लागला.एक दिवस एक
म्हातारी,जखमी म्हैस त्याच्या झोपडीच्या वळचणीला आली.तिची जखम धुवून त्याने त्यावर हळद लावली.तिला त्याचा लळा लागला.ती रोज त्याच्याकडे येऊ लागली.तिची ती अवस्था पाहून तो म्हणाला, ” बायलीला! मालकाला जणू काळजीच न्हाई. बरूबर हाय.म्हातारी डोबड.ती काई आता दूध द्यायाची न्हाई. मंग कशाला खायला काळ जनावराची कोन कशाला काळजी करितो !” एकदा चुकुन तिचा पाय त्याच्या पायावर पडून त्याला मोठी जखम झाली.त्याच्या अंगात ताप भरला. एक दिवस तो दरडीवरून कोसळला.त्याला ठिकठिकाणी जखमा झाल्या.अशातही त्याचा दिनक्रम सुरूच होता.एक दिवस कुणीतरी आल्याचा त्याला भास झाला.शारीरिकदृष्ट्याही तो खूप खचला होता.त्याला जो भास झाला होता त्याचं वर्णन करताना ,लेखक म्हणतात ,” शेवटी आता हांतरूणावरून उठवेना झाल्यावर बुधानं त्या कुणाला तरी ओळखलं होतं.तो सोयरा वनचर होता.तुकारामबाबांना भेटलेला.अन् तोच पुन्हा एकदा बुधाला शोधीत आला होता.कशासाठी? त्याच्याशी एकरूप होण्यासाठी ? देहाची ही खोळ टाकून देण्यासाठी? तो बुधाला बोलवीत होता ?अन् बुधानं त्याला ओळखलं नाही ?” बुधाच्या भावना त्याच्याच शब्दांत मांडताना लेखक म्हणतात, ” तो येईल. आपण हा सुरकुतलेला देह टाकून वर उठू.त्या वेळी तो आपलं बोट धरून.आपल्याला घेऊन जाईल. करवंदांच्या फुलांशी गोष्टी करण्यासाठी.बाहव्याच्या शेंगांना लटकून झोके घेण्यासाठी. सावरीच्या म्हाता-यांबरोबर आकाशात उडण्यासाठी.नक्कीच घेऊन जाईल “. एक दिवस बुधाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. अगदी शांतपणे.
त्याचे शब्दांकन करताना,लेखक म्हणतात, “झुंजुरकं फुटलं.ढगांच्या पडद्यांतून तांबडा प्रकाश झरू लागला.ती जाणीव होताच इतके दिवस जणू घरट्यात कोंडून घातलेली पाखरं चिवचिव करीत घरट्याबाहेर पडली. बुधाच्या चिमण्या घाईघाईने त्याच्या झोपडीकडे उडाल्या. झोपडीचं दार लावलेलं नव्हतं. बक-या आधासल्यासारख्या झोपडीबाहेर पडत होत्या. चिमण्या चिवचिव करीत दारात बसल्या. पण त्यांना नेहमीप्रमाणे सावा टाकलेला दिसला नाही.बुधाला जागं करावं ,म्हणून त्यांनी खूप कलकलाट केला.त्या तिथल्या तिथं नाचल्या. तितक्यात खारीही उंबरावरून खाली उतरून झोपडीच्या दारात आल्या. त्या दारातच थांबल्या नाहीत. झोपडीत शिरल्या. पण त्यांना नेमलेल्या खांबापाशी नागलीच्या भाकरीचे तुकडे दिसले नाहीत. मग त्या आश्चर्याने चिरचिरत पाहू लागल्या.
त्यांचं पाहून चिमण्याही आत आल्या. आत आल्यावर त्यांना दिसलं- त्या सगळ्यांना दिसलं की,आपले मायाळू धनी शांतपणे झोपला आहे.त्याच्या अंगाला मुंग्या लागल्या आहेत “.
बेगडी ,नकली आणि अप्पलपोटी शहरी माणसांपासून दूर जाऊन आपल्या जन्मगावी रहायला येणा-या आणि एकटेपणाने, अनेक अडचणी येऊनही,जगणा-या आणि शेवटी त्याच मातीत मिसळून जाणा-या एका सर्वसामान्य माणसाची ही कथा आहे.
काही घटनांमुळे मानसिकदृष्टय़ा खचलेल्या आणि अपघाताने शारीरिक दुर्बलता आल्याने कथेतील नायकाला आपला दिसू लागणारा मृत्यू तो सहजपणाने स्वीकारतो. एका जीवनप्रवासाला सुंदर शब्दांत गुंफून ही अजोड साहित्यकृती निर्माण झाली आहे.
@ प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ