मुसळेंच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप; रेल्वेस्टेशन रोडवरील खड्डयात पडून अपघात…
कणकवली
कणकवली रेल्वेस्टेशन मार्गावरील रस्त्यावर खोदलेल्या खड्डयामध्ये पडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ मुसळे यांचा मृत्यू झाला. नगरपंचायत ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही बाब घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर कणकवलीवासीयांतून तीव्र संताप व्यक्त झाला.
काल (ता.११) दुपारपासून कणकवली नगरपंचायतीच्या गटार लाईनसाठी रेल्वेस्टेशन येथील रस्ता खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे पंधरा फुट खोलीचे आणि दहा फुट रूंदीचे हे गटार काल सायंकाळपर्यंत खोदण्यात आले. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावण्यात आले नव्हते. सायंकाळी साडे सातच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या रवींद्रनाथ मुसळे (वय ६९) यांना या रस्त्यावरील खड्डयाचा अंदाज आला नाही. त्यामुळे पंधरा फूट खोल गटारात पडून श्री.मुसळे हे जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमारास खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगरपंचायत ठेकेदाराच्या कार्यपद्धतीबाबत शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त झाला.