You are currently viewing फोंडाघाटात कारमध्ये जळालेला तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच

फोंडाघाटात कारमध्ये जळालेला तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच

डीएनए अहवाल प्राप्त : घातपात नसून होता अपघातच

कणकवली

राधानगरीहून कणकवलीकडे येत असताना फोंडाघाटापासून वरच्या बाजूला खिंडी पासून काही अंतरावर वागदे येथील उद्योजक निलेश विवेकानंद काणेकर( वय ४५) उर्फ एन के यांच्या इर्टीगा कारला १० मार्च २०२२ मध्ये सायंकाळी आग लागून ती कार पुर्णपणे भस्मसात झाली होती. यामध्ये चालकाचा जळालेल्या अवस्थेत सांगडा आढळून आला होता. जळालेली कार निलेश काणेकर यांचीच असल्याने व त्या परिसरात त्यांचे मोबाईल लोकेशन आढल्याने तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच असल्याचा संशय होता. मात्र पोलिसांनी याबाबतची खात्री करण्यासाठी सांगडयातील हाडांमधील अवशेष आणि निलेश काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणीसाठी पाठविले होते. अलीकडेच या प्रयोगशाळेचा अहवाल कणकवली पोलिसांना प्राप्त झाला असून ते डीएनए नमुने नातेवाईकांशी मिळते जुळते असल्याने जळालेल्या कारमधील सांगाडा हा निलेश काणेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती तपासी अधिकारी कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली. तसेच कार जळल्याची दुर्घटना ही अपघातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्योजक निलेश काणेकर हे काही कामानिमित्त त्यांची नवी इर्टीगा कार घेऊन १० मार्च रोजी कोल्हापूर-राधानगरीला गेले होते. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास फोंडाघाटापासून वरच्या बाजूला खिंडीपासून काही अंतरावर देवगड-निपाणी मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक कार जळताना आढळून आली होती. मात्र आगीची दुर्घटना एवढी भीषण होती की कार पूर्णपणे जळून गेली होती. कारच्या नंबरवरुन ती कार निलेश काणेकर यांचीच असल्याचे स्पष्ट झाले होते. कारमध्ये चालकाच्या सीटवर सांगडा आढळला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना फोंडाघाट चेकपोस्टवरील सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता त्याच दिवशी निलेश काणेकर यांची कार राधानगरीच्या दिशेने गेल्याचे दिसून आले होते. तर त्या परिसरात निलेश काणेकर यांचे मोबाईल लोकेशन आढळून आले होते. त्यामुळे तो मृतदेह त्यांचाच असल्याचा संशय होता. दरम्यान त्याच रात्री उशिरा जळालेल्या गाडीतील तो मृतदेह काणेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल्याने याबाबत पोलिसांकडून सर्व प्रकारे तपास सुरू होता.त्या दिवशी निलेश काणेकर हे आपण राधानगरीला जातो असे सांगून कार घेऊन बाहेर पडले होते. दरम्यान याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्या सांगाडयाच्या हाडांचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठवले होते.

त्यासाठी पोलिसांनी श्री. काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने घेतले होते. जवळपास सात महिन्यांनी डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्या सांगाडयातील अस्थींचे नमुने आणि काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने मिळते जुळते असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नातेवाईकांचीही त्याबाबत खात्री झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सांगितले. दरम्यान कारला लागलेली आग ही अपघातच असून कोणताही घातपात नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्याचे श्री. खंडागळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा