*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी माझे विचार*
ज्ञानाचे साधन। साधुनी विज्ञान। विज्ञानाची जाण। भाषा खरी।।
महानुभावपंथापासून साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारी अशी आपली मराठी भाषा! आज या भाषेने साहित्यक्षेत्रामध्ये जो मैलाचा दगड गाठलेला आहे त्याला जगात कुठेही तोड नाही. संत, पंत आणि कितीतरी महंत यांनी या भाषेकरता जे योगदान दिलेले आहे, जी काही विपुल संपदा निर्माण केलेली आहे ती जागतिक स्तरावर दखलपात्र आणि अतिशय समृद्ध अशीच आहे. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी आणि शौरसेनी या सहा भाषांपासून तयार झालेली मूळ मराठी आपल्याला संत आणि पंत वाङ्मयात वारंवार प्रत्ययास येते. अनेक वर्षांच्या यवनांच्या सत्ताक्रमणामुळे त्यामध्ये फारसी, तुर्की, अरबी शब्दांचा भरणा झाला. नंतरच्या काळातील इंग्रज-पोर्तुगीजांच्यामुळेही तिच्यात भरच पडली. आजची मराठी ही अनेक कसोट्यांवर तावून-सुलाखून, लख्ख सोनं म्हणून आपल्यासमोर चमचमत आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय स्तरावर मराठी भाषेचा आधार घेऊन आपल्या अनेक पिढ्या विद्वान झाल्या. या भाषेच्या आधारानेच त्यांची बौद्धिक, मानसिक जडणघडण झाली पण ज्ञानभाषेचा विचार करताना मात्र मराठी भाषेला अजूनही दुय्यम स्थान मिळताना आपल्याला दिसतं. याचं कारण सर्वच क्षेत्रांसाठी मराठीतून अभ्यासक्रम अजूनही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत किंवा त्यांची परिणामकारकता दिसलेली नाही.
गेल्या काही वर्षात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. जागतिक भाषेचा दर्जा तिला मिळाला. जागतिकीकरण, जीवघेणी स्पर्धा, चढाओढ, चुरस, मागे पडण्याची भीती अशा अनेक कारणांमुळे मराठीचे महत्त्व कमी होऊन इंग्रजीला थोडे वरचे स्थान मिळाले. याचबरोबर इंग्रजी शाळांना अनुकूल असे धोरण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, मराठी शाळेतील शिक्षणाचा दर्जा अशीही इतर अनेक कारणं आहेत. पण या सर्वांच्या मुळाशी असणारं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठीविषयीचा आपल्या मनातला न्यूनगंड आहे, जो आपल्या मराठीला ज्ञानभाषा होण्यापासून रोखतोय. स्वभाषेविषयीची इतकी अनास्था इतर कोणत्याही भाषेत सहसा आढळत नाही.
मला वाटतं, मराठी भाषा ही नक्कीच ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी फक्त आवश्यकता आहे ती आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवरील योग्य प्रयत्नांची! सर्वप्रथम आपल्या मनातील न्यूनगंड दूर सारला पाहिजे. आपला मराठीवरील विश्वास दृढ झाला पाहिजे. आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण मिळावे यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे. त्यामुळे दर्जेदार मराठी शाळा तयार होतील किंवा ज्या आता बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत त्यांना पुन्हा नव्याने उभारी मिळेल. या बदलांमुळे काही समस्या निर्माण होतीलही परंतु त्या समस्या हाताळण्याची मानसिक तयारी आपण पालक म्हणून करायला हवी आणि आपल्या पाल्यांना त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी बळ द्यायला हवे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शाळेच्या शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. भाषेच्या शुद्धतेचा आणि व्याकरणाचा आग्रह धरायला हवा. शिक्षकांकडून सुद्धा ती भाषा शुद्ध आणि व्याकरणिकदृष्ट्या योग्य पद्धतीने लिहिली, वाचली, शिकवली जावी आणि मुलांकडूनही ती तशीच घोटवून घेतली जावी. सर्वच स्तरातील मुलांसाठी सुखसोयींनी युक्त अशी महाविद्यालये, अभियांत्रिकी-वैद्यकीय शिक्षणसंस्था तयार व्हायला हव्यात. शाळेपासूनच विविध क्षेत्रातील माहिती आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द द्यायला हवेत. सावरकरांनी शब्दकोश तयार करून अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिलेलेच आहेत. आता नवनवीन क्षेत्राशी संबंधित असणारे असे वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे शब्दकोश तज्ञांकडून तयार करवून ते वापरात आणले गेले पाहिजेत. संस्कृत आणि मराठी यांच्यातील सामायिक अशी देवनागरी लिपी ही तर मराठीसाठीची जमेची बाजू! संस्कृतमधून अनेक पर्यायी शब्द या सर्व शाखांसाठी थोड्याशा प्रयत्नाने सहज उपलब्ध होऊ शकतात. तज्ञांनी या विषयात संशोधन करून जरूर ती तंत्रविद्या विकसित करावी. गणितासारखे विषय तर मातृभाषेतूनच शिकवले गेले पाहिजेत असे जागतिक स्तरावर संशोधनाधारे हल्ली मान्य केले गेले आहेच.
राज्य, केंद्र आणि जागतिक पातळीवरसुद्धा मराठी भाषेचा प्रसार व्हायला हवा. कर्नाटक राज्याप्रमाणे मराठी विषयात योगदान देणार्यांसाठी काही सरकारी पदे राखून ठेवली जावीत. त्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत. काही स्पर्धा, काही मेळावे आयोजित व्हायला हवेत. स्वतंत्र मराठीभाषा मंडळ स्थापन करून त्याद्वारे प्रसार, प्रचार केला जावा. मराठीतून उच्चपदविका आणि पदव्या मिळवणार्यांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी, प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य दिले जावे.
नवोदितांकडून उत्कृष्ट साहित्यसंपदा आज पुन्हा नव्याने निर्माण होण्याची गरज आहे. मागणी तसा पुरवठा या न्यायाने जर लोकाग्रह वाढू लागला तर राजकीय इच्छाशक्तीलासुद्धा लोकानुनयासाठी अनेक गोष्टी करण्यास भाग पाडता येऊ शकते. जागरूक आणि सुजाण नागरिक म्हणून आपणच पुढाकार घेतल्यास राजकीय प्रतिनिधींनासुद्धा याची दखल घ्यावीच लागेल.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!
समर्थ रामदासांच्या या उक्तीप्रमाणे आपण स्वतः पासून, आपल्या घरापासून सुरुवात केली तर नजिकच्या काळामध्ये मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. माय मराठीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आज आपण सारे संकल्प करूया!
—हेमंत श्रीपाद कुलकर्णी,
मुलुंड(प), मुंबई