*निवडणूक बिनविरोध करा…पक्ष कित्याक होयेत..?*
*वरचे नेते एकत्र खातत आणि राजकारणान भावकित वाद होतत..!*
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील कित्येक गावात रोज एकमेकांची तोंड पाहणारी लोकं पक्षीय राजकारणामुळे एकमेकांचे वैरी असल्यासारखे वागू लागले. काही वर्षांपूर्वी पर्यंत गावाच्या पंचायतीच्या निवडणुका या गावातील ज्येष्ठ लोकांच्या संगनमताने बिनविरोध व्हायच्या, त्यामुळे गावात हेवेदावे, दुफळी नसायची. गावातील देवस्थान वगैरेंचे मानकरी ठरवतील त्याप्रमाणे प्रतिनिधी निवडले जायचे. परंतु मागील काही वर्षात ग्रामपंचायत निवडणुका देखील विधानसभा असल्याप्रमाणे अटीतटीच्या होऊ लागल्या आहेत. गाव विकासाचे स्वप्न घेऊन उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला पैशांच्या जोरावर नामोहरम केले जाते. मतदानासाठी पाच वर्षात एकदा मिळणाऱ्या पाचशे हजार रुपयांसाठी आपले मत चुकीच्या व्यक्तीच्या पारड्यात टाकले जाते आणि पुढील पाच वर्ष मात्र विकले गेल्याने बोलण्याचा हक्क गमावून बसतात. सख्ख्या भावाला विरोध करून पक्ष श्रेष्ठ मानून भावाच्याच विरोधात भाऊ उभे राहतात, अशावेळी लांबून तमाशा पाहणारे मात्र सख्ख्या भावांमध्ये होणाऱ्या झुंजीची मजा घेतात आणि त्यामुळेच भावकीत वाद उत्पन्न होतात. भाऊ भावाचे वैरी बनतात.
ग्रापंचायत या स्वायत्त संस्था आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात नाहीत तर गाव पातळीवर निवडणुका होतात. गावातील निवडणुका त्यासाठीच तर प्रत्येकी स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढवतात. जिथे लढाई सारखी मतदान प्रक्रिया असली तरी त्यात गावाचे, समाजाचे स्वास्थ्य सांभाळून गावचा सलोखा राखून मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या अन्यथा संपूर्ण गावाने एकजूट दाखवून ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध कराव्या, जेणेकरून सरकारचा म्हणजेच आपला पैसा वाया जाणार नाही आणि गाव एकसंघ राहील. गावातील तिसऱ्या फळीतील विविध पक्षांचे नेते, नसलेली आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि पक्षाकडून मिळणारा निधी लंपास करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात जाऊन गावातील एकोपा बिघडवत आहेत. त्यामुळे एका पंगतीला बसून रोज एकत्र जेवणारे देखील आज एकमेकांची तोंड पाहत नाहीत, अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये पहायला मिळत आहे.
ग्रामपंचायती मध्ये निवडून आल्यावर आर्थिक लाभ घेता येईल अशी स्वप्नं पाहत अनेकजण पैसा ओतून मतदार विकत घेत आहेत. दारू, मटणाच्या पार्ट्या तर रोज झडतात, त्यामुळे अन्न खाणारे गद्दारी करणार नाहीत अशी समज करून घेत अनेक नेते उशाखाली हात ठेऊन आरामात राहतात. काही तर गावातील ग्रामदेवतेच्या गाऱ्हाण्यात ठेवलेला नारळ देखील शपथा घेण्यासाठी वापरतात, अशा अंधश्रद्धेपोटी लोक चुकीच्या व्यक्तींना बळी पडतात आणि स्वतःचा मतदानाचा हक्क भाड्याने लावल्या सारखे इतरांच्या मागून फिरतात. एका मतासाठी बाहेरगावी असणाऱ्या लोकांना सुद्धा प्रवासखर्च आणि खाण्यापिण्याचे पैसे देऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून आणले जाते. सध्याचे राजकारण म्हणजे पैसा…! अशीच परिस्थिती आज पहायला मिळत आहे. “सत्ता म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे सत्ता” हे समीकरण आजकाल तयार झालं आहे, यामुळे ग्रामीण भागातील संस्कृती बिघडत चालली आहे. अशा विक्षिप्त परिस्थितीमुळे खरोखर गाव विकासासाठी झटणारा उमेदवार पडतो आणि लोकांना लाथाडणारा मात्र चार दिवस पैसे वाटून पाच वर्षे लोकांवर राज्य करतो.
दिवसेंदिवस निवडणुकांमध्ये पैशांच्या जोरावर वाढणारी अरेरावी, दादागिरी यामुळे सज्जन लोकांसाठी राजकारण शिल्लक राहिले नसून उद्दाम, उर्मट लोकांसाठीच राजकारण हा आखाडा म्हणून शिल्लक राहिले आहे. बदलणारी राजकीय परिस्थिती पाहून आज गावागावांतील सुशिक्षित सुसंस्कृत लोक मात्र “निवडणूक बिनवीरोध करा, पक्ष कित्याक होयेत? वरचे राजकारणी एका ताटात जेयतत, आणि राजकारणामुळे आमच्या भावकित वाद होतत” असा सूर लावू लागले आहेत. नव्या पिढीने चढाओढीत राजकारण न करता गावागावात सलोखा राखण्यासाठी एक पाऊल मागे येत निवडणुका या बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा आणि समाजापुढे इतर गावांपुढे आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा आज सर्वसामान्य माणूस करू लागला आहे.