अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र चव्हाण, उद्घाटक अभय खडपकर
कुडाळ
”घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेच्यावतीने सोमवार दि. १२ रोजी कसाल हायस्कूलच्या सभागृहामध्ये ‘घुंगुरकाठी बालकुमार साहित्य संमेलना’चे आयोजन लेखक आणि कल्पक दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सई लळीत यांनी दिली. संमेलनाचे उद्घाटन अभिनेते अभय खडपकर यांच्याहस्ते होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. लळीत म्हणाल्या की, सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत चार सत्रात हे संमेलन होईल. धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या संमेलनाचा विद्यार्थी अध्यक्ष म्हणून नववी इयत्तेतील प्रणव प्रकाश सावंत याची, तर विद्यार्थी स्वागताध्यक्ष म्हणून आठवीतील विद्यार्थिनी मुग्धा सुधीर बालम हिची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सत्र, प्रकट मुलाखत, कथाकथन, विद्यार्थी कविसंमेलन आणि समारोप अशा सत्रांमध्ये हे संमेलन होईल.
संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. लळीत म्हणाल्या की, आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे, वाचनापासुन दूर गेली आहे, असे सातत्याने बोलले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मात्र याबाबत ठोस काही केले जात नाही. बालकुमार गटासाठी साहित्याची निर्मितीचे प्रमाणही कमी आहे. पालकांमध्येही याबाबत निरुत्साह दिसतो. यामुळे बाल-कुमारांमध्ये साहित्याची, वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
हे संमेलन जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना खुले आहे. विद्यार्थी कविसंमेलनातही विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना आपल्या कविता सादर करता येतील. मात्र यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपले व शाळा, हायस्कुलचे नाव रविवारपर्यंत 9422413800 या वॉटस्अपवर कळवणे आवश्यक आहे. संमेलनाला धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब उपस्थित राहणार आहेत. मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर समारोप सत्रात मनोगत व्यक्त करणार असून श्री. निलेश महेंद्रकर सूत्रसंचालन करणार आहेत. कथाकथन सत्रात अभय खडपकर, श्रेयश शिंदे, मंगल राणे, निलेश पवार, डॉ. सई लळीत कथाकथन करतील. या संमेलनाला विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे.