इचलकरंजी/प्रतिनिधी
इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे संस्कृती प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. दुसरे संस्कृती साहित्य संमेलन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, मानव सेवा केंद्रच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. नामवंत कवी आणि समीक्षक प्राचार्य गोविंद गाजरेकर (सावंतवाडी) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषेचे अभ्यास डॉ. गिरीश मोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
इचलकरंजी येथील काकासाहेब मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह माने स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाला सुप्रसिद्ध कवी आणि संस्कृती प्रतिष्ठानचे सल्लागार अजय कांडर (कणकवली) आणि कवी मधुकर मातोंडकर (रत्नागिरी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी बालाजी उद्योगाचे संस्थापक मदन कारंडे, इचलकरंजी नालंदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मुख्य मार्गदर्शक डॉ अमर कांबळे, इचलकरंजी रोटरी सेंट्रलचे प्रेसिडेंट अशोक जैन, सेक्रेटरी श्रीकांत राठी इचलकरंजी आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार आदिना प्रमुख उपस्थितांमध्ये निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री कांबळे म्हणाले, इचलकरंजीच्या चांगल्या साहित्य वाचकांमध्ये परिवर्तन विचाराचे साहित्य जास्तीत जास्त पोहोचावे आणि इचलकरंजीचे सांस्कृतिक क्षेत्र नव्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहाला जोडले जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इचलकरंजी शहरामध्ये संस्कृती प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. गेल्या वर्षी पहिले साहित्य संमेलन कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. त्यानंतर त्यांची या संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. आता दुसरे साहित्य संमेलन कवी आणि समीक्षक अशी ख्याती मिळविलेल्या प्राचार्य गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे तीन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व संस्कृती कादंबरी पुरस्कार प्रदान समारंभर होईल.. आणि दुस-या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वांड:मयाच्या एका प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यावर्षी उत्कृष्ट कादंबरीला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून या पुरस्कारासाठी बीड येथील प्रसिद्ध कादंबरीकार विजय जावळे यांच्या “लेकमात” या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
तर शेवटच्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून या कविसंमेलनासाठी सोलापूरचे कवी सफरअली इसफ, शैलेश खुडे, वैशाली माळी(पुणे), स्वप्नाली ढोनुक्षे,जीवन बरगे,राहूल राजापूरे आणि विनायक होगाडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या संमेलनात साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-पंडित कांबळे- (91461 06688) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.
या पत्रकार बैठकीस संस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.