मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची इनामची महापालिकेकडे मागणी
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. त्याचबरोबर सध्या सुरू असणारे रस्त्यांच्या पॅचवर्क काम दर्जेदार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप टेंगल यांना देण्यात आले. निवेदन स्विकारुन डॉ. ठेंगल यांनी संबंधितांना पॅचवर्क काम दर्जेदार करण्याबाबत आदेश दिले. तर आरोग्य अधिकारी यांनी नुकतीच निर्बिजीकरणासाठी अंदाजपत्रके मंजूरी घेतली असून निविदा प्रक्रिया राबवून १५ दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन दिले.
इचलकरंजी शहरातील नादुरूस्त रस्ते व खड्ड्यांच्या पॅचवर्क कामाची इनामंमार्फत पाहणी केली असता खड्डे धूळ व मातीने भरलेले असतानाच पॅचवर्क केले जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वरचेवर खडी टाकली जात असून मोठ्या खडीऐवजी बारीक खडीची जाडी जास्त आहे. तसेच खडी रस्त्यावर पसरून वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे हॉटमिक्सचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सप्टेंबरमध्ये कुत्री चावल्यानंतर ३९९, ऑक्टोंबर मध्ये ३५४, नोव्हेंबर मध्ये ४२४ अशा ११७७ जणांनी प्रथम डोस घेतल्याची नोंद आहे. त्यामध्ये खाजगी दवाखान्यातील आकडेवारी समाविष्ठ नाही. सारासार विचार केल्यास रोज भटकी कुत्री किमान २५ जणांचे लचके तोडत असून प्रशासन सुस्तच असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी इनामंचे राजु कोन्नुर, अमित बियाणी, अमोल ढवळे, उदयसिंह निंबाळकर, संजय डाके, जतीन पोतदार, अभिजित पटवा उपस्थित होते.