सिंधुदुर्ग :
राष्ट्रीय अपंग विकास महामंडळ महाराष्ट्र यांचे सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन पुरस्कृत राज्यस्तरीय दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्ती पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक तथा पणदूर येथील दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष श्री पुष्कराज कोले हे या सर्वसाधारण व्यक्ती आदर्श सामाजिक कार्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
श्री पुष्कराज कोले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो गरीब लोकांसाठी सर्व प्रकारच्या मदतीचा हात दिलेला असून जवळपास तीन हजार दिव्यांग बांधवांना कृत्रिम साहित्य मोफत देऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या अजोड कार्याचा गौरव म्हणून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील यांनी “पुरस्कार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत श्री पुष्कराज कोले यांना सदर पुरस्कार जाहीर केला आहेे. या पुरस्काराने दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीच्या पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे कार्याध्यक्ष मा. शशिकांत अणावकर, उपाध्यक्ष मा. प्रकाश जैतापकर, सचिव मा. डॉ. अरुण गोडकर, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व तमाम विद्यार्थी वर्गाच्या वतीने मा. कोलेसाहेब यांचे हार्दिक अभिनंदन केलेले असून सिंधुदुर्गवासीयांच्याही वतीने श्री पुष्कराज कोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .