*वक्रतुंड साहित्य समूह संस्थापक लेखक कवी जगन्नाथ खराटे यांचा ६ डिसेंबर २०२२ “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. आदरांजली “विशेषलेख”*
*”महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जिवनगाथा.”‘*
.
समाजात दोन वर्ग आहे एक आस्तिक आणि नास्तिक, ह्यापैकी आस्तिक वर्गाला परमेश्वराचं अस्तित्व मान्य असतं तर नास्तिक वर्ग ते नाकारतात. पन् जरा खोलपने बघितलं तर वरवर पाहता,नास्तिक वर्ग जरी मनाने देवाला मानंत नसला तरी त्या अस्तित्वाशिवाय तो जगुंच शकंत नाही.अन् त्याचा अंतरात्मा हांच देव असतो हे त्याला कळत नसल्याने तो देवंच नाही असं समजतो.. हा त्याचा भ्रम असतो….
.
ईश्वर, म्हणजे चरचाचरांत व्यापुन उरणारी चैतन्यमयी शक्तिं.अणुरेणु ती शक्ती अनंत आकाशाला व्यापुन उरणारी अशी आहे..अन् त्या शक्तीचा स्रोत हा मानवी देहाच्या सहाय्याने अनंत मानवांच्या कल्याणासाठी तेजःपुंज असं कल्याणकारी कार्य करीत असतो.मगते कार्य अध्यात्मिक,अथवा पारलौकिक असु शकते. किंवा भौतिक असु शकते . सत्कार्य हे भौतिक असो वा अध्यात्मिक असो ते दैवीकार्य असते. अन् हे दोन्ही कार्य करणारे किंबहुना समाजसेवी कार्य करणारे,हे मानव देवदुत ठरत असतात.किंबहुना ते महामानव ठरतात अन त्यांचं ते कल्याणकारी दैवी कार्य युगानुयुगे मानवासाठी चैतन्य प्रदान करुन आनंद, सुख शांती देणारं ठरतं.अन ते मानव, महामानवांच स्थान मिळवून मानवांच्या ह्रदयात चिर:काल चिरंजीव असतात..
अशाप्रकारे जगात अनेक महामानव होवुन गेले, त्यांच्यामागे आपल्या “भारतभूमीच्या इतिहासात सुद्धा अशा अनेक महामानवांपैकी असा एक महामानव जन्मला की त्याने समाज मनाच्या स्वकेंद्रीत विचारांची दिशांच बदलुन टाकली.अन दैदिप्यमान अशा कर्तृत्वाचा पाया रचुन समाजातील अन्यायाला वाचा फोडुन तो युगप्रवर्तक ठरला.. असे महामानव म्हणजे डॉ भिमराव रामजी आंबेडकर… पन् लोकं त्यांना आदराने डॉ- बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते ………..
खरंतर, संकुचित मानव हा फक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांपुरतेच मर्यादित असे कल्याणकारी कर्म करतो पन् जेव्हा त्याचे हेंच कार्य,असिमित अमर्यादित होते, तेव्हा तो सर्वसामान्य मनुष्य महामानव किंबहुना महापुरुष बनतो. अन् हे,सर्व महामानव किंवा युगपुरुष हे जात पंथ भेदभावरहित होवून समस्त जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत असतात.. अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी ते सदैव कार्यरत असतात. त्यामुळेंच त्यांच ते कार्य अतुलनीय ठरतं. अन् म्हणूनंच ते महापुरुष सर्वांसाठीच वंदनीय असतात….
आपल्या देशातील पावन भूमीत अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन समाजासाठी सामाजिक, बांधिलकीच्या भावनेतून राष्ट्रनिष्ठा जोपासली. त्यामुळे त्यांचं ते भव्यदिव्य कार्य देशवासियांसाठी, मार्गदर्शक असा दिपस्तंभ ठरलं..
अगदी पुरातन काळापासून आपल्या समाजात असणार्या सर्व दलित, उपेक्षित,वंचित,अन् समाजाच्या परिघाबाहेर असणाऱ्या समाजाला एक मानाचं स्थान देण्यासाठी त्या काळात कुणीही वाली नव्हतं.अशावेळी बहिष्कृत मूकनायक,जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांना पहिला बोलका स्वर सापडला.. तो. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर..खरं तर शतकानुशतके अज्ञान,दारिद्र्य,गुलामी व शोषणाच्या चक्रव्यूहातल्या समाजाचे मुक्तिदाता होते ते.. त्यांचं व्यक्तिमत्त्व है चौफेर होतं,, किंबहुना त्याला क़हिनुर ह्याप्रमाणे अनेक पैलू होते. ज्ञानाबद्दल प्रचंड ज्ञानलालसा असनारा हा असणारा हा प्रकांड पंडीत असा आधुनिक विज्ञानेश्वरच होता…अविद्या ही मानवाची अवजड बेडी ..अन् ही तोडण्यासाठी आपल्या जवळ ज्ञानाचा हातोडा असायला पाहिजे,अशी त्यांची धारणा होती. कष्ट करुन ज्ञान मीमांसा मांडणार्या हृया आधुनिक पंडितांच्या जवळ,सारासार विचार आणि विवेकाचा मिलाफ होता…
समाजातील प्रत्येक घटकाला समान अधिकार तथा समान वागणूक हा एकमेव उद्देश अन् आजन्म ज्ञान साधना करुन त्यांनी स्मुतीच्या कप्यांत दैदिप्यमान असं ज्ञानभांडार समृद्ध केलं.अन ते स्वातंत्र्य,समता,बंधुता अशा घटनेचे शिल्पकार ठरले.. ..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपले जीवन कार्याचा आढावा पाहिला असता असं प्रकर्षाने जाणवतं की ते आधुनिक भारताच्या निर्मितीचे जनक आहेत. खरं तर त्यांना अत्यंत सिमीत असं आयुष्य लाभलं होतं.अन अशा६५वर्षाच्या सिमित अशा अर्ध्या आयुष्यात, म्हणजे वयातील ३०वर्ष हे, अत्यंत कष्टदायक अशा ज्ञानसाधनेत गेले.. उरले २५वर्षे… साधारणपणे चलेजाव नंतर म्हणजे इस.सन १९४६ नंतरचे २५वर्षे… पन् हे तर सुरवातीच्या काळापेक्षाहि व्यस्त असे होते.यामध्ये, चवदारतळे सत्याग्रह, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्षस्थापना, निवडणुका, गोलमेज परिषद, आणि हजारो मैलांचा प्रवास,, हे सारं काही फक्त आपल्या देशबांधवांसाठी, पन ते अगदी मनापासून …. अगदी तळमळीनं मनाच्या तिव्र निष्ठेने,आत्मियतेने फक्तं अन् फक्त देशसेवेसाठी..
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान,अशें अनेक पैलू असलेले कोहीनुर हिरा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर,,
आपल्या जीवनात समाजासाठी आपलं सर्वंच आयुष्य खर्ची घालुन समाजातील तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेबांनी दीन, दलित,श्रमिक विस्थापित, शोषितांच्या अंधकारमय जीवनांला ज्ञानाचा प्रकाश देवुन समाज मनाला समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी अज्ञानात झोपी गेलेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागे केले, त्यांनी पुस्तकी ज्ञान, आचार आणि विचार यांची सांगड घालून तत्वज्ञानास कृतीची जोड देऊन व मंगलमय मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली… डॉ. बाबासाहेबांचे विचार तितकेच महत्त्वापूर्ण आहेत त्यांच्या मते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. म्हणून सर्वांना शिक्षणाचा हक्क हा सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सर्वांगीण शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे ध्येय ठरते,म्हणुनंच, स्वातंत्र्य,समता,बंधुता ही मानवी मूल्ये घटनेचा पाया ठरली.. डॉ. बाबासाहेबाची ग्रंथसंपदा अफाट आहे.तसंच इतर लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह, इंग्रजी लेखनाचा आहे.डॉ,बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली असल्याने मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश,हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी इ भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी मुख्यत्वे लेखनातून ,धर्मसुधारणा व समाज सुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं होतं..
शिक्षण विषयक धोरणासोबत शेती विषयक सखोल,अभ्यासपूर्वक विश्लेषण हे शेती प्रमुख मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्यांचा आर्थिकदृष्ट्या विकासासाठी बाबासाहेबांचं सर्वात्मक विकास हे धोरण अत्यंत महत्त्वाचं ठरलं.अन जर आर्थिक गणित तळागाळापर्यंत झिरपलं तर शेतकर्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आर्थिक विषमता कमी होवुन, आपसुकच जातीय भेदभावाची दरी कमी होईल ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना त्यांनी मांडली. शेतीचे राष्ट्रीयकरण होवून’ शेतीसंदर्भात. पीकपाणी, बांध, उत्पादकता, साठवण, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम असावेत अशा. डॉ. बाबासाहेबांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात येवुन त्याबाबत कायदे व नियम बनविले गेले. हे सर्व डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचंच योगदान आहे .
जिवन हे अगदी खळाळत्या निर्झरासारखं असावं अन् हेंच जिवन बाबासाहेब जगले. त्यांचं संपूर्ण जिवन ही एक शोधयात्रा ठरलं. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहचलेले एक शूरविर होते. जीवनाचं तत्वज्ञान हे सोप्या पद्धतीनुसार त्यांच्या जीवनामध्ये गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना मानाचं स्थान होतं अन् तिंच संस्काराची देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे वंशसातत्याने चालतं आली.त्यामुळे ते एक श्रेष्ठ ग्रंथकार झाले. विचारमग्न दशेत हातात लेखणी घेऊन लेखन करताना त्यांना वेळ काळाचे भान उरत नसे.विद्यार्जनाच्या प्रदीर्घ प्रवासात.एम. ए.(कोलंबिया), पीएच.डी.(कोलंबिया), डी.एससी.(लंडन), एलएल. डी.(कोलंबिया), डी. लिट.(उस्मानिया), बार-अँट-लॉ (लंडन). शिक्षण, अधिक शिक्षण,उच्च शिक्षण मिळवले .अन् त्याहूनही उच्च शिक्षण मिळावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती..
खरं तर, त्यांचं जीवन हे सर्वंकश किंबहुना भावसंपन्न असावं .अन् अशा कलात्मक भावसंपन्नतेचं जिवन जगताना आपल्या मानव बांधवांना आत्मप्रत्ययाची स्पूर्ती देण्यासाठी एकाचवेळी साधी आणि उच्च विचारसरणी असं उत्कट जीवन जगणारे हे महापुरुष, महामानव धर्ममार्गासाठी अत्यंत जागरूक होते. तसेच, ते उच्च असे मीमासंकसुद्धा होते, त्यांच्या दृष्टिक्षेपात आले की, गौतम बुद्धांनी “धर्म” या संज्ञेऐवजी “धम्म” हा पारिभाषिक शब्द वापरुन माणूस हांच धम्माचा केंद्रबिंदू ठरवला.अन्. म्हणूनंच नीतिमत्ता, सदाचरण हा बुद्धांच्या धर्म विचारांचा पाया आहे.म्हणूनच आंबेडकर धर्म विचारांच्या आधुनिक विज्ञानाशी सुसंगत अशा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना मान्यता देणार्या भगवान गौतम बुद्धांच्या धर्म हा शील, स्विकारला.प्रज्ञा आणि करुणा या जीवन तत्त्वांवर आधारित अशा बुद्ध धम्माचे निस्सीम ते अनुयायी बनले.. “बहुजन हिताय-बहुजन सुखाय” धर्मचक्र प्रवर्तन करू पाहणाऱ्या गौतम बुद्धांचा धर्म हा मानवप्रणित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होती..
अशा ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जिवनगाथेचा विचार करताना एक अनुत्तरित प्रश्न पडतो की,
अगदी,सोईसुविधांचा अभाव किंबहुना दुष्काळ,असणार्या अगदी कंठींन अशा प्रतिकुल परिस्थितीतही,हजारो मैलांचा प्रवास,.अनेक चळवळी…,असंख्य ठिकाणी भाषने,…असंख्य लोकांशी सुसंवाद,..निरक्षर, हीन दीन दुर्बल समाजबांधवबद्दलची आत्मियता अन् त्यांचीही बाबासाहेबांवरची अढळ श्रद्धा,.. संपूर्ण देशभर बुद्ध धम्म प्रसार,..अन् हजारो अनुयायांच मनो मिलन,असंख्य साहित्यसंपदा, आणि धर्मग्रंथांचे लेखन….तसेच वाचनाची आवड,…अतुलनिय जगप्रसिद्धि,अन् असंख्यात लोकानुनय, ..ह्या सारख्या गोष्टी अगदी ६५ वर्षाच्या सिमित आयूष्याच्या उत्तरार्धात, किंबहुना सायंकाळी, अशा काय साध्य केल्या?? पन् मला वाटतं..ह्यांचं एकंच उत्तर असु शकतं की,अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे “दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाने ” सामान्य मानव महामानव होतो…
अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेवुन,आपल्या कार्याचा चिरंजीव असा सुगंधाने मन प्रफुल्लित करणारा ठसा मागे उमटवला,..असे हे दलितांचे कैवारी, महान युगपुरुष,धम्मप्रवर्तक
युगपुरुष,बोधीसत्व,किंबहुना महामानव,डॉ-बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि उत्तुंग कर्तृत्वाला विनम्रतेने अभिवादन करुन मानाचा त्रिवार मुजरा!!!!💐💐💐💐
©️श्री-जगन्नाथ चां.खराटे
ठाणे