*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललीतलेख*
*पाहिला मी गाव स्वप्नांचा*
स्वप्नील दुनियेत नसतं कुणाला डुंबायचं…. पापण्या मिटताच वाटतं, स्वप्नांच्या कुशीत शिरायचं…शांत मिटल्या पापण्यांच्या आड, सुंदर गाव पहायचं…नकळत त्या सुंदर गावात रमून जायचं….!
जिथे असावा एक डोह आनंदाचा…उंच डोंगरावरून अलगद पाझरावा झरा सौंदर्याने नटलेला…मंदिर असावे पायथ्याशी कळस उंच आभाळी टेकावा…भूगर्भातून धरणीवरती जलाभिषेक व्हावा…कुंदकळ्यांचा दरवळ नसानसांत भरून जावा…राजवाड्याच्या कुशीतून सोनसळी किरणांची पखरण करत रविने डोकवावे…तेजोमय सुवर्णगोल केशर शिंपित मोती भरल्या तलावात आरक्त डुंबून जावा…पाण्यावरती सोनेरी, लाल-केशरी किरणांची गर्दी व्हावी…हा सुवर्णसोहळा पाहण्या शुभ्र धवल खगांनी सैर करावी…अवकाशीच्या धवल नभांनी हळूच डुबकी घ्यावी…तरू लतांनी काठावरूनी पहावे वाकुनी… नेत्रदीपक तो सोहळा पाहुनी तन मन आनंदून जावे…अलौकिक सुंदर क्षण सुखाचे नेत्रांजनी साठवून घ्यावे…!
पहाटे पहाटे तृणपात्यांवरच्या नाजूक कोवळ्या दवबिंदूंना हळुवारपणे पदस्पर्शाने बाजूस सारताना ते सुद्धा हसत हसत पायांना चिकटत होते…कुणी पदकमलांच्या प्रेमापोटी आनंदाने प्राणांची आहुती देत होते…कुणी पदकमलांसोबत पहाटेची सैर करत फिरत होते…जसजसे पद गरम व्हायचे…नाजूक कोवळ्या तनावर अवचित लुप्त होत होते…कुणी सोनसळी किरणे अंगावर लेवून उसनं सोन अंगावर घालून मुरडत होते…जशा नवतरुणी एखाद्या सोहळ्यात नवनवीन कपडे, दागदागिने घालून मुरडतात तसे चमकत होते… हळूहळू रवि झाडापेडांचा आडोसा दूर सारून वर येतो…तो लालसर केसरी रूपवान तेजोगोल तेव्हा अवर्णनीय दिसतो…मोती तलावातील शांत जलाशयात अलगद उतरतो…आपली केसरी किरणे जलाशयात चहू बाजूना सांडतो अन् डुंबण्या मनसोक्त डुबकी मारतो…रविला जलाशयात उतरलेला पाहताच शुभ्र धवल बदकांचा समूह त्याच्यासोबत मस्ती करण्यासाठी वेगाने पुढे येतो…खेळतो…एक दोन सेल्फी काढून घेतो…स्वतःच्याच मस्तीत हसतो अन् जसजसा वर वर सरकतो तसतसा दूर नभांच्या शहरात हरवून जातो…!
अशा या माझ्या सुंदरवाडीत एक ना अनेक नवनवीन वैशिष्ट्य आहेत…मोती तलाव काठच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचे…जुन्या दगडी इमारतीचे प्रतिबिंब जलाशयात असे काय उतरते…जणू आरश्यात आपला मुखडा पाहत राहते…जलाशयातील हालणाऱ्या पाण्यात ते प्रतिबिंब स्वतःशीच बोलत असते… काठावरची तरू लताही अशावेळी थोडीच मागे राहणार… जलशयाच्या आरश्यात सर्वांग सुंदर असलेलं आपलं रुपडं पाहण्यात ती दंग होतात…हळूच वाकून डुंबणाऱ्या रवि किरणांचाही खेळ पाहतात अन् गालातल्या गालात हसतात. जलशयाच्या पाण्यावरून अलगद जलाच्या वाफा उठत असतात…जलाशयाच्या गर्मीचे हवेच्या थंडाव्याशी होणाऱ्या मिलनाची जणू त्या वाफा साक्ष देत असतात. तापलेल्या पाण्यावर जशा वाफा याव्या तशाच जलाशयाच्या बाह्यांगावर वाफांचे तरंग उमटत असतात…ते नयनमनोहर दृश्य नयनांनी तृप्त करून सोडतं… रविची सोनेरी किरणे विठ्ठल मंदिराच्या कळसावर पडताच त्याची भव्यता लक्ष वेधून घेते…मोती तलावाच्या एका बाजूने जेव्हा विठ्ठल मंदिराच्या कळसाकडे पाहतो तेव्हा मंदिराचा तो शेकडो फूट उंच असणारा कळस नभांगणाला हात टेकवतो की काय असा भास होतो…विठ्ठलाच्या मंदिरातील पहाटेच्या काकड आरतीचा स्वर त्या कळसाच्या आत असा काय घुमतो की जणू तो विठ्ठलासी पंढरपुरी संवाद साधतो की काय असं प्रतीत होतं… “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” चा नाद दूर आसमंतात घुमतो… पंकजदलांनी वेढलेल्या कळसाच्या एका एका टप्प्यांकडे पाहिले की शिल्पकलेचा अद्भुत नमुना कसा बनवला असेल हे कोडं पडतं…
कित्येकवर्षं पूर्वीच्या आत्मेश्वराच्या समोर पाणी पिण्यासाठी शिवभक्त स्वामीजींनी”जय माते भगीरथे” म्हणत फेकलेल्या त्रिशूळाच्या प्रहाराने जमिनीच्या चार फूट वरून भूमीकडे कोसळणारे तळीचं पाणी म्हणजे जणू श्री शिवशंकरांच्या भूमीवर जलाभिषेक होत आहे की काय असेच प्रतीत होते…तळीचे चवदार पाणी… घासून स्वच्छ केलेल्या सोन्याची झळाळी येणाऱ्या तांब्याच्या कळशीत भरताना येणारा तो ध्वनी म्हणजे जणू शंभूच्या नावाचा जयघोषच…! पहाटे तळीवर बायकांची होणारी लगबग…गोऱ्या गालावर ओघळणाऱ्या केसांच्या बटा सावरीत धुण्यासाठी आणलेले कपडे विसळताना होणारी कंकणांची खणखण मधुर सूर ऐकवायची… गप्पांमध्ये रंगणाऱ्या बायांच्या मैफिली… अन् मध्येच खळाळणारं हास्य…खरंच, सुखावून जायचं…!
दगड गोट्यांना चिंब भिजवत न्हाऊ घालत नरेंद्र डोंगरकडून येणारा छोटासा ओढा पुढे नदीस मिळतो…त्या ओढ्याच्या स्वच्छ, निर्मळ पाण्याचा उगम मात्र हिरवाईने नटलेल्या…शांत सुंदर, विलोभनीय अशा नरेंद्र डोंगरावर होतो…शेंदूर लेवून लाल केशरी रंगातील मारुतीरायाच्या सानिध्यात उगम पावणारा इवलासा निर्झर म्हणजे मारुतीचे तिर्थच…!खडकात उगम पावणारा…मारुतीच्या पायाखालून वाहणारा निर्झर खळखळतो…सरसर, झरझर करत मारुतीरायांच्या पावन भूमीकडून खोल दरीत झेपावतो जणू धरणीला सांगतो, “हे धरणी माते, मला तुझ्या कुशीत विसावू दे….” धरणी सुद्धा आपल्या विस्तीर्ण बाहुत त्याला सामावून घेते… आलिंगन देत कुशीत विसावू देते… जसं आई आपल्या तान्हुल्याला थंडी लागू नये…म्हणून उबेसाठी पोटाशी धरते अगदी तशीच… नरेंद्रच्या कड्यावरून जणू मोती सांडावेत आणि ते टिपण्यासाठी असंख्य वृक्ष वेलींनी ओंजळ करून झेलावे… तशी झाडे, वेली निर्झराच्या फेसाळत कोसळणाऱ्या थेंबाथेंबाला आपल्या अंगोपांगी झेलतात… पाना फुलांची तृष्णा भागवत निर्झराचे मोत्यांसारखे तुषार धरणीच्या कुशीत विसावत होते…थेंब थेंब साठवून मित्र मैत्रिणींचा घोळका जमा होऊन सहलीला निघतो तसे निर्झराचे पाणी ओहळातून वाहत वाहत नदीस मिळते…ते खळाळणारं पाणी पाहतंच रहावंसं असं वाटायचं…!
परमेश्वराला पडलेलं स्वप्न
असा सुंदर माझा गाव…
नरेन्द्राच्या कुशीत बसला
सावंतवाडी तयाचे नाव…
निसर्गाने भरभरून दान पदरात ठेवलेला…मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेला…राजघराण्याची छत्रछाया अन् पूर्वम्पार सांस्कृतिक वसा जपणारे..अध्यात्माचे धडे गिरवणारे…योग, प्राणायाम…व्यायाम, पहाटेची सैर…नानाविध तंदरुस्तीच्या कवायती…हिरवाईने, फुलांच्या शेकडो प्रकारांनी बहरलेली उद्याने…विस्तीर्ण चेंडूफळी अन् सीमेवर रक्षणकर्ता ३६५ खेड्यांचा अधिपती देव उपरलकर…राजवाड्यात स्थानापन्न देव पाटेकर…यांच्या कृपाशीर्वादाने भक्तिमय वातावरणात डुलणारे… केशवसुतांच्या संध्याकाळ… तुतारी कवितांनी सजलेलं… कट्ट्यावर तुतारी अंगाखांदावर घेतलेलं…कवी डॉ.वसंत सावंत यांनी आपल्या काव्यात “परमेश्वराला पडलेलं एक स्वप्न” असे वर्णन केलेला सुंदरवाडी…माझ्या स्वप्नातीलच सावंतवाडी पाहिला मी गाव स्वप्नांचा…!!!
©(दीपी)
®दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६
पाहिला मी गांव……
इतकं हळूवार आणि काव्यात्मक वर्णन…
अक्षरशः आपण स्वतःच तो प्रवास अनुभवल्याची अनुभूती आली!
खूप आवडलं दीपकजी.