अन्यथा दोडामार्ग वनकार्यालयासमोर जनावरांना बांधू; बाबुराव धुरी
दोडामार्ग
भेकुर्लीत पाळीव जनांवरांवर दिवसांगणिक वाढत चाललेले वाघांचे हल्ले स्थानिकांच्या जिवावर बेतणारे झाल्याने दोडामार्ग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आक्रमक होत थेट दोडामार्ग वनक्षेत्रपाल कार्यालयावर मोर्चा नेत वनक्षेत्रपाल कन्नमवार व जिल्हा उपवनसंरक्षक रेड्डी यांचं लक्ष वेधले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, बाबुराव धुरी, बाळा गावडे, जानवी सावंत यांनी खासदार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा वनखात्यावर नेला होता.
यावेळी त्या हल्लेखोर वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करावा अन्यथा तेथील लोकांचं पुनर्वसन करावं अशी जोरदार मागणी करण्यात आली. सातत्याने वन्यप्राण्यांच्या हल्लाने भेकुर्ली येथील धनगर बांधव हैराण झाले आहेत. अगदी एक आठवड्यात ४ जनावरे आणि आतापर्यंत १२ जनावरांना या वाघांच्या जोडीने ठार केले आहेत.
याबाबत बाबूराव धुरी सातत्याने या लोकांच्या संपर्कात होते. त्यांनी वनखात्याचे सुद्धा वेळोवेळी लक्ष वेधले. मात्र वनखात्याने ठोस उपाययोजना न केल्याने सेनेने आक्रमक होत वनखात्याचे लक्ष वेधले. वनक्षेत्रपाल आणि थेट उपवनसंरक्षक यांना कडक इशारा सुद्धा देण्यात आला आहे. प्रसंगी पिंजरा लावून त्या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास आपण सर्व जनावरे व तेथील कुटुंब यांना घेऊन दोडामार्ग वनकार्यालयासमोर जनावरांना बांधू असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
वनखात्याला भेकुर्लीतील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत शिवसेनेनं जाब विचारला असताना शनिवारी दुपारी पुन्हा एकदा नाना मया पाटील यांच्या जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच डोळे उघडून ठोस भूमिका घ्यावी. आत जनावर संपली मग ती हिंस्त्र झालेली वाघाच्या नर मादी मानवावर हल्ला कधीही करू शकतात. यासाठी आता तरी वनविभागाने जागे होऊन त्या ठिकाणी आपले सर्व यंत्रणा वापरून नर मादी या दोघांनाही जेरबंद करावे अशी मागणी केली.