You are currently viewing बांद्यातील प्रसिद्ध सुवर्णकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व राजाराम उर्फ आबा धारगळकर प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक रिंगणात

बांद्यातील प्रसिद्ध सुवर्णकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व राजाराम उर्फ आबा धारगळकर प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक रिंगणात

बांदा:

 

बांदा ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक १ मधून बांद्यातील प्रसिद्ध सुवर्णकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व राजाराम उर्फ आबा धारगळकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बांदा शहरातील एक फ्रेश चेहरा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. बांदा येथील क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या आबा धारगळकर यांना याठिकाणी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या निकटवर्तीय व्यक्त करत आहेत. या प्रभागात नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजपचे कट्टर कार्यकर्ते असलेले, भाजप शहरची पदाधिकारी असलेले आबा धारगळकर यांना याठिकाणी ही निवडणूक सोपी ठरण्याची शक्यता आहे.

याबाबत आबा धारगळकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी असलेली त्यांची वैयक्तिक ओळख, भाजपच्या माध्यमातून येथील लोकांसाठी केलेले काम आणि एक सोज्वळ चेहरा अशी प्रतिमा असल्याने त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

आबा धारगळकर यांची बांदा बाजारपेठेत सुवर्णपेढी आहे. त्यामुळे त्यांची बांदा शहरातील प्रत्येक वाडीवर घराघरात ओळख आहे. सर्वांना परिचित असलेला हा नवीन चेहरा निवडणूक रिंगणात दिसत असल्याने प्रभाग १ मधून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या भाजप पुरस्कृत इतर दोन उमेदवारांनाही धारगळकर यांचा फायदा होणार आहे.

आबा धारगळकर हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. प्ले बॉईज बांदा, रामभरोसे बांदा, आमची वाडी देऊळवाडी या संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने आबा धारगळकर यांना ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे.

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असून ग्रामपंचायत सदस्य उमेदवारीसाठी अनेक इच्छुक चेहरे समोर येत आहेत. बांदा ग्रामपंचायत निवडणूक भाजप विरुद्ध गाव विकास पॅनेल अशी होणार असल्याने भाजपकडून कोण आणि गाव विकास पॅनेलकडून निवडणूक रिंगणात कोण याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा