बांदा :
बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा युवा, उच्चशिक्षित आणि आश्वासक चेहरे दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. बांद्यातील निवेदनातील बहारदार आवाज म्हणून ओळख असलेल्या आणि पदवीधर असलेल्या सौ. रुपाली सुधीर शिरसाट यांनी प्रभाग ५ मधून सदस्य पदासाठी आणि थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रभाग ५ मध्ये मतदारांना नवा आश्वासक आणि उच्चशिक्षित चेहरा पाहायला मिळणार आहे.
बांदा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच थेट सरपंच पदासाठी आणि प्रभाग ५ साठी सौ. रुपाली शिरसाट यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या सौ. रुपाली शिरसाट यांनी डी.फार्मसी ही पदवीही मिळवली आहे. बांदा लोकोत्सव, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच आपल्या बहारदार आणि अभ्यासू निवेदनाने त्यांनी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवत घराघरात आपले नाव पोचवले आहे. बांदा गांधीचौक येथे असलेल्या पी.एम.शिरसाट मेडिकल अस्थापनाची जबाबदारी पती सुधीर शिरसाट यांच्याबरोबर त्या समर्थपणे पेलत आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा असल्याने त्यांना निवडणुकीत फायदा होणार आहे.
भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. बांदा येथील विविध भाजपच्या कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे.क्रिएटिव्ह सखी या महिला मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा मोलाचा सहभाग असतो. तसेच बांदा शहरात ‘रुपाताई’ या नावाने त्यांची वेगळी ओळख असून अनेकांच्या अडीअडचणीना त्यांनी पुढाकार घेत मदत केली आहे.ग्रामपंचायत सफाई कामगारांना भाऊबीज करत एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
भाजपचा एक युवा, सुपरिचित आणि आश्वासक चेहरा म्हणून रुपाली शिरसाट यांना पसंती आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सौ. रुपाली शिरसाट यांचे एका जाहीर कार्यक्रमात कौतुक करताना ‘तुमच्यासारखी धडाडीची कार्यकर्ती राजकारणात असायला हवी’ असे उदगार काढले होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने सौ. शिरसाट यांना संधी मिळाली आहे. सर्वसामान्यांना आपल्याशा वाटणाऱ्या या नव्या चेहऱ्याला मतदारांकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे पती सुधीर शिरसाट यांचाही जनसंपर्क असल्याने आणि तेही भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्काचा फायदा रुपाली शिरसाट यांना मिळणार आहे.
सौ. रुपाली शिरसाट यांनी आपण समाजाचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्यां मार्गी लावण्यासाठी या निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगत मतदार आपल्यावर नक्की विश्वास दाखवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.