You are currently viewing या पुढे दिव्यांगांच्या मदतीसाठी दिव्यांगदूत म्हणून काम करणार –  डॉ. विद्याधर तायशेट्ये

या पुढे दिव्यांगांच्या मदतीसाठी दिव्यांगदूत म्हणून काम करणार – डॉ. विद्याधर तायशेट्ये

वागदे गोपुरी आश्रम येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा..

कणकवली

दिव्यांग बांधव हे सुद्धा समाजातीलच एक घटक आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांचे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दिव्यांगत्व दूर होत असेल तर आपण नक्कीच त्यासाठी प्रयत्न करु. या बांधवांना कधीही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास अवश्य हाक द्या, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.यापुढे दुव्यांगदूत म्हणून आम्ही सर्वजण काम करू,असे प्रतिपादन डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९९२ रोजी जाहीर केल्यानुसार दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन साजरा केला जातो.

या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत जागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो.

शनिवारी वागदे येथिल गोपुरी आश्रमात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकता दिव्यांग विकास संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.विद्याधर तायशेट्ये बोलत होते. यावेळी दिव्यांग बंधू भगिनीच्या समस्या आणि त्यांचे निरसन करण्यात आले. तर काही जण दिव्यांगांच्या वेगवेगळ्या योजनांपासून दूर राहिले ते कशासाठी राहिले? शासन, प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही का ? या बाबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांवर वेळीच तोडगा कसा काढता येईल याबाबत भूमिका घेण्यात आली.

यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,विजय शेट्टी, विजय गावकर, संस्था अध्यक्ष सुनील सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, डॉ. विद्याधर तायशेट्ये, अर्पिता मुंबरकर, रवींद्रनाथ मुसळे, समाज कल्याण निरीक्षक अनिल गोरीकर, धनलता चव्हाण, स्टेट बँक निवृत्त कर्मचारी सावंत उपस्थित होते.

यावेळी डॉ. विद्याधर तायशेट्ये म्हणाले,समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति फक्त सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील नवीन डॉक्टरांच्या साहाय्याने आणि मार्गदर्शनाने लवकरच आपण एक शिबीर घेवू.तसेच शस्त्रक्रिया करून दिव्यांगत्व दूर होत असेल तर त्यासाठी प्रयत्न करू.मात्र ,तुम्ही सर्वजण कुटुंबाप्रमाणे एकत्र रहा असेही डॉ. विद्याधर तायशेट्ये  म्हणाले.

अशोक करंबेळकर यांनी दिव्यांग बांधवांच्या रोजगार निर्मिती बाबतच्या समस्या मांडल्या. बँकेत कर्ज प्रक्रिया करायची असेल तर दिव्यांगांकडे जमीन नसल्याने त्यांचे कर्ज प्रस्ताव फेटाळले जातात ही चिंताजनक बाब आहे,असे सांगितले. मात्र,आपण वेळीच या दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन त्यांना त्यांचा न्याय मिळवून देवू व दिव्यांगांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी आम्ही काही संघटना दिव्यांग दूत म्हणून काम करणार असल्याचे करंबेळकर  म्हणाले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग तसेच साहायक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग चे समाज कल्याण निरीक्षक अनिल गोरीकर व धनलता चव्हाण यांनी देखील मार्गदर्शन केले. सर्वोत्तोपरी समस्या मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सचिव सचिन सादिये यांनी सुत्रसंचालन केले. तर सुनील सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व बावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिव्यांगानी मांडले आपले प्रश्न आणि समस्या!

संजय गांधी निराधार योजनेमार्फत मिळणारी १००० रुपये पेन्शन ही ५००० करावी, जिल्हातील दिव्यांग बांधवाना त्या त्या जिल्ह्यात नोकरी मिळावी. दिव्यागांना मिळणारे घरकुल योजनेचे अनुदान किमान २.५ लाख ते ३ लाख करावे. नोकरदार दिव्यांग बांधवाच्या प्रश्न आणि समस्या सोडवाव्यात. दिव्यांगांच्या वाहन परवाना बाबत योग्य निर्णय व्हावा. सध्या होत असलेल्या दिव्यांग भवन मध्ये दिव्यांग बंधु-भगिनीना नोकरी मिळावी. कर्ज योजनेसाठी दिव्यांगांना एका बॅकेची व्यवस्था करावी. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरतीमध्ये प्राधान्याने नोकरी मिळावी. दिव्यागांना मिळणाऱ्या अनुदानाचे प्रस्ताव तातडीने किमान दोन महिन्यात मंजुर व्हावेत. दिव्यागांच्या पेन्शन योजना वयोमर्यादेनंतर बंद करू नये. जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींना नोकर भरतीच नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याबाबत उपाययोजना करावी.

अशा प्रकारचे प्रश्न दिव्यांग बांधवानी मांडले. सद्य परिस्थितीत दिव्यांग बांधव कशा प्रकारचे चटके सहन करतोय हे पाहून उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यातही अश्रू आले. तर काहींना तिथे येणारी व्यक्ती कशा पद्धतीने येत आहे तिची परिस्थिती काय आहे हे पाहून हळहळ व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा