You are currently viewing विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ – तारांगण प्रत्यक्ष आता सिंधुदुर्गात

विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ – तारांगण प्रत्यक्ष आता सिंधुदुर्गात

स्वस्तिक फाऊंडेशन , युरेका सायन्स क्लब व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल चे आयोजन, कसाल व तळेरे येथे होणार उपक्रम

कणकवली

स्वस्तिक फाऊंडेशन मुंबई , युरेका सायन्स क्लब कणकवली, विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमिन पर ‘ या खगोलशास्त्रीय ज्ञान देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन ७ ते १० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. हा उपक्रम ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विद्यानिकेतन कॉव्हेंट हायस्कूल कसाल तर १० डिसेंबरला तळेरे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. एकाचवेळी प्रत्यक्ष तारांगणाचा लाभ ३०विद्यार्थी घेऊ शकतील.

सकाळी नऊ ते पाच या वेळेत एक एक तासाच्या तीस विद्यार्थ्यांच्या बॅच होणार आहेत. शाळा ,विद्यार्थी यांनी तीस तीस च्या ग्रुप मध्ये रजिस्ट्रेशन केल्यास सर्वांना सोयीस्कर वेळ देणे आयोजकांना सोपे जाईल.पुस्तकाद्वारे आत्मसात केले जाणारे खगोलशास्त्रीय ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळावे व त्याची अधिकची माहिती व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण ही संकल्पना तशी अनभिज्ञ आहे. अर्थातच या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे जास्तीजास्त जवळून, प्रात्यक्षिक रुपात दर्शन घडेल व त्याचा फायदा त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासात होईल, असा विश्वास स्वस्तिक फाऊंडेशनने व्यक्त केला आहे.

उपक्रमात एका मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. त्यामाध्यमातून डोमद्वारे एक तासाचा ‘ तारे जमी पर हा तारांगण शो’ दाखविण्यात येणार आहे. यात प्लॅनेटोरियम चा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेतील. त्यानंतर उपस्थित तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी ,पालक ,शिक्षक, विज्ञानप्रेमी, खगोलप्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीपिका रांबाडे (८५३०७००१०२) , युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी (९४२२९९७८७६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा