You are currently viewing सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा ॲड.स्वाती आवटी दीक्षित

सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा ॲड.स्वाती आवटी दीक्षित

सामाजिक कार्यकर्ती दुर्गा
नवरात्रोत्सवात सामाजिक कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा आपण परिचय करुन घेत आहोत.

आजच्या आपल्या दुर्गा आहेत
सामाजिक कार्यकर्त्या ॲड.स्वाती आवटी दीक्षित. या ठाण्यातील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करीत आहेत
त्यांचे व्यावसायिक शिक्षण LLB आणि MBA असून त्यांनी वकिलीची सुरुवात श्रीरामपूर येथे केली. त्यानंतर 2000 ते 2007 पर्यंत त्या दोन शैक्षणिक संस्थांच्या संचालिका होत्या. 2008 पासून त्या ठाणे आणि वरळी येथे चॅरिटी कमिशनर कोर्टात प्रॅक्टिस करीत आहेत.
त्यांना सामाजिक भान आणि सामाजिक कार्याचा वसा लहानपणापासून त्यांच्या आई वडीलांकडून मिळाला.
घरात कायम तेच वातावरण असल्याने अगदी तरुण वयात त्यांच्यात नेतृत्वगुण दाखवण्याची आणि समाजासाठी काही तरी करण्याची त्यांची तळमळ स्वस्थ बसू देईना.यातूनच झटून काम करण्याची त्यांची वृत्ती आपल्याला दिसून येते.
अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्यासोबत स्वाती यांनी कला, संस्कृती, खेळ इत्यादी क्षेत्रात अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.
मी सगळ्यात शेवटच्या रांगेतील स्वयंसेवक” हे त्यांचे ब्रीदवाक्य आणि ते कायम जपत झोकून देऊन काम करणे आणि तरीही प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहणे हे त्यांचे गुण असल्याने प्रत्येक वेळी सोबत काम करणाऱ्या व्यक्तीना त्यांच्यासोबत काम करण्यास हुरूप येत असतो.
२०१४ साली झालेल्या उपवन आर्ट फेस्टिवल मधे त्यांनी ठाण्यातील 50 हून अधिक व्यावसायिक आणि कलाकारांच्या साथीने यशस्वी होण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यातून प्रेरणा घेऊन ‘ स्वत्व’ या अनोख्या नागरिकांच्या समूहाची निर्मिती झाली ज्याच्या त्या सहसंस्थापिका आहेत.
स्वत्व म्हणजे ठाण्यातील अनेक नव्या संकल्पना राबविणारी संस्था असे समीकरण आताशा ठाणेकरांना परिचयाचे झाले आहे
महापालिकेच्या पर्यावरण उपक्रम, भिंती रंगवा उपक्रम, प्लास्टिक बंदी साठी प्रचार, मराठी नाट्यसंमेलन, बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि कलासंकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने लावलेले प्रदर्शन अशा प्रकारच्या उपक्रमात स्वत्व सोबत स्वाती यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे
ठाण्यात झालेल्या दोन महापौर चषक सायकल स्पर्धा आणि दुसरे सायकल संमेलन हे स्वातीताई यांच्या पाठपुराव्याने आणि अथक परिश्रमाने शक्य झाले.
स्वत्व व्यतिरिक्त रोटरी, इनरव्हील, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सायकलिंग क्लब्स सारख्या अनेक संस्थांशी स्वाती जोडल्या गेल्या आहेत.
साध्या पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी करण्याची हातोटी आणि सर्व वयोगटाच्या लोकांशी आपुलकीने संवाद साधण्याचे कौशल्य यामुळेच त्या एकाच वेळी अनेक कार्यक्रम , स्वतःचा व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदारी असे आजच्या भाषेत म्हणायचे झाल्यास मल्टिटास्किंग सहजगत्या करीत आहेत. आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अशा या तडफदार, तेजस्वी आणि कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्त्या दुर्गेस आम्ही लेखिकांकडून मानाचा मुजरा.

सौ.मानसी मोहन जोशी
कार्यवाह आम्ही लेखिका
ठाणे शाखा

प्रतिक्रिया व्यक्त करा