मालवण :
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुरुवारी मालवणात आगमन झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी चौके व कुंभारमाठ येथे जल्लोषी स्वागत केले होते. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवबाग येथून ते आंगणेवाडी येथे श्री देवी भराडीच्या दर्शनास निघाले.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आंगणेवाडी येथे मंदिर परिसरात दाखल झाल्यावर राज ठाकरे यांचे आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळी पूर्ण मंदिर पाहता येत नाही, मात्र आज मोकळेपणाने मंदिर बघता आले. अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांसमवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, धीरज परब यांच्यासह मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, गणेश वाईरकर, मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे तालुकाध्यक्ष संदिप लाड आदी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.