*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*मिलन*
हिरव्यागार कुंजवनात
पहा उभे पहारेकरी
झुळझुळणारे झरे
आसमंती नाद भरी……
हिरवीगार वनराई , आकाशाला भिडू पाहणाऱ्या उंच उंच डोंगर रांगा या डोंगरातून उंचावरून कोसळणारे धबधबे जणू पांढऱ्या शुभ्र तुषारांनी धरतीला आलिंगन देत होते.
याच डोंगररांगातून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता सरपटत जाणाऱ्या अजगरासारखा महाभयंकर दिसत होता . तर रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले हिरवेगार वृक्ष जणू पहारेकरीच भासत होते.
दुसऱ्या बाजूला जरा जरी वाकून पाहिलं तरी काळजाचा ठोका चुकेल इतकी खोल दरी . उंच डोंगरावरून कोसळत आदळत आपटत सोबत दगड – गोटे , माती , कचरा या सर्वांना आपल्या प्रवाहात समाविष्ट करत नदी धावत होती . तिला ओढ लागली होती प्रियकराला भेटण्याची !
लागली ओढ मज तुला पाहण्याची
तुझ्या अंतरात लुप्त होण्याची …..
आवेशाने तीव्र वेगाने वाटेतल्या मोठमोठ्या दगडांची , खोल खोल दऱ्यांची पर्वा न करता या सर्वांना दूर सारून वेगाने ती आपल्या प्रियकराला , सागराला भेटण्यासाठी धावत होती .
वाटेत भेटणाऱ्या झाडांसोबत , फुलाफळांसोबत ती हसत होती . पाना आडून गाणाऱ्या कोकिळेच्या मधुर सुरात ती खळाळणारा आपला सूर मिसळत होती .
प्रिया बावरी मी तुझी तुझ्या संगती खुलते तुझेच गीत गाउनी तुझ्या अंतरी फुलते…….
किलबिलणाऱ्या पक्षांच्या घरकुलात थोडावेळ विसावत होती . किनाऱ्यालगतच्या हिरवळीला सुजलाम् सुफलाम् करत होती. आणि पुन्हा नव्या ओढीने आतुरतेने धावत होती.
अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहून मात्र ती हिरमुसली व्हायची . कारण तिला अंधार आवडत नव्हता . अंधाराची तिला भीती वाटायची . “उंचावरून कोसळत , दगडांचा मारा सहन करत , खाच खळग्यातून मार्ग काढत आपण चाललो खरे पण खरोखरच आपल्या जीवनात तेजाचा प्रकाश पडेल का ? आपल्या प्राणनाथाशी आपली भेट होईल का ?” रात्रीच्या अंधारात तिचे मनही काळ्याकुट्ट काळोखाने ग्रासायचे. एक ना अनेक विचार मनात तरळायचे .
अंधाराची चादर लपेटून घेत संथ गतीने ती मार्गक्रमण करत असतानाच पुन्हा नवी पहाट घेऊन व नवी स्वप्ने नव्या दिशा यांचे मनोरे रचत उगवता रवी हस्तांदोलन करत तिचे स्वागत करायचा .
रवीची सोनेरी किरणे तिच्या मनातील काळोखाला लख्ख करून टाकायची . पुन्हा नव्याने रवीच्या तेजोमय प्रकाशात झळकत सरिता नव्या दमाने पुन्हा आपला मार्ग शोधत पुढे जायची. कित्येक वर्ष खळाळत पुढे पुढे सरकत जात असतानाच दुरूनच आवेशाने आपल्या प्रेयसीला मिठीत घेण्यासाठी आतुरलेला पांढराशुभ्र फेसाळणारा सागर तिला दिसला . अत्यानंदाच्या या क्षणाने नदी पूर्ण मोहरून गेली . लज्जने चूर झाली. लाजत मुरडत हळुवार पावले टाकत ती सागराजवळ आली . सागराला बिलगली व त्याच्या मिठीत विसावली. सागर व सरिताचे मिलन झाले.
तुझ्या माझ्या भेटीची
. साक्ष देतो उगवता रवी
जन्मोजन्मीचे हे नाते
प्रिया तुझी साथ हवी…..
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*