You are currently viewing अंमली पदार्थ लागवडीबाबत महसूल, पोलीस, कृषी, वन विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी

अंमली पदार्थ लागवडीबाबत महसूल, पोलीस, कृषी, वन विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी

– उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी

अंमली पदार्थ लागवडीबाबत महसूल, पोलीस, कृषी, वन विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.

उपजिल्हाधिकारी श्री. सोनोने म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या ई-पिक पहाणी ॲपवर पीक नोंदणीचे काम सुरु आहे. ई-पीक नोंदणी करताना गांजा लागवड झाली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी तात्काळ यंत्रणांना कळवावे. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नशाबंदी, व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यसनामुळे होणाऱ्या आजाराबाबत कार्यक्रम घ्यावेत.व्याख्यान, कार्यशाळा त्याबरोबर प्रशिक्षण याचे आयोजन करावे. सर्व विभागांनी संयुक्तपणे अंमली पदार्थ लागवड, विक्री तसेच वाहतूक याविरोधात मोहीम राबवावी

बैठकीला विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, राज्य उत्पादन शुल्कचे दिवाकर वायदंडे, सीमा शुल्क निरीक्षक रवी इंदोरीया, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मिलींद पाटील, पोस्टाचे सहायक अधीक्षक विनायक कुलकर्णी, सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा