माजी नगरसेवकांची मागणी; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन…
सावंतवाडी
येथील पालिकेत कायमस्वरूपी नगरपरिषद अभियंताची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवकांकडून सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान सावंतवाडीतील “त्या” रिक्त पदावर सद्यस्थितीत वेंगुर्ले पालिकेतील अभियंता कार्यरत आहेत. दोन्ही ठिकाणचा कार्यभार हाताळताना ते सावंतवाडी पालिकेला पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही नियुक्ती तातडीने करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत आज श्री. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, राजू बेग व परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद आहे. याठिकाणी नगरपरिषद अभियंता या पदावर सध्या कायमस्वरुपी कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या सावंतवाडी येथे नगरपरिषद अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार वेंगुर्ला नगरपरिषद येथील नगरपरिषद अभियंता है सांभाळत आहे. त्यांच्याकडे वेंगुर्ला येथील कार्यभार असल्याने ते सावंतवाडी नगरपरिषदेला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. आठवडयातून एक किंवा दोन दिवस ते सावंतवाडी नगरपरिषदेत काम करतात. सध्या सावंतवाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रात बांधकामाची अनेक कामे सुरु असून सदर कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायमस्वरुपती नगरपरिषद अभियंत्याची नगरपरिषदेस अत्यावश्यकता आहे. तरी सावंतवाडी नगरपरिषदेत कायमस्वरुपी नगरपरिषद अभियंता नियुक्त करणेबाबत संबंधित विभागास आदेश व्हावेत.