इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर 5 ते 9 जानेवारी 2023 या कालावधीत ‘रोटरी ट्रेड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 163 हून अधिक स्टॉलची मांडणी करण्यात येणार असून सर्वसामान्यांना एकाच छताखाली त्यांना हव्या त्या सर्व प्रकारच्या वस्तु खरेदी करता याव्यात या उद्देशानेच हे प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धुत व रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन मुकेश जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, रोटरी ट्रेडफेअरचे 22 वे वर्ष असून इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या रोटरी क्लबच्यावतीने दरवर्षी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजने केले जाते. आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नातून वर्षभर गरजूंंना मदत, प्लॅस्टिक सर्जरी, रक्तदान शिबीर, विविध शाळांना संगणक, बेंच वितरण, स्वच्छतागृहाची सोय, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, प्रबोधनात्मक व्याख्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन, वैद्यकिय तपासणी, रक्तदान शिबिर, विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत यासह अनेक सामाजिक उपक्रम राबलवले जातात.
या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून सर्व प्रकारचे कपडे, आर्टीफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती साधने, मोबाईल, दुचाकी-चारचाकी वाहने, वॉटर प्युरिफायर, ऑटोमोबाईल यासह अनेक विविध स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत. याशिवाय खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी पदार्थांचे विविध प्रकार आईस्क्रिम, ज्यूस, फूट स्टॉल त्याचबरोबर मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, बालचमुंसाठी मिनीवर्ल्डचेही नियोजन केले आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी ट्रेड फेअर ही व्यावसायिक उत्पादक, विक्रेते, संस्थांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम पर्वणी आहे. प्रदर्शनात 163 स्टॉल असून त्यापैकी 50 टक्के स्टॉलचे बुकींग झाले असून इच्छुकांनी उर्वरीत स्टॉल निश्चित करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रेड फेअरचे चेअरमन मुकेश जैन यांनी केले. यावेळी महेंद्र मुथा, अभय यळरूटे, मनिष मुनोत आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी मुकेश जैन (9325700145), प्रकाश रावळ (7776826500), सत्यनारायण धूत (8830638709), प्रकाश गौड (9422040650), संजय – घायतिडक (9520005212) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.