सिंधुदुर्गनगरी
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग, कॅरम तसेच बुध्दीबळ स्पर्धेचे यजमान पद सन 2022-23 साठी आपल्या जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.स्पर्धेच्या विविध आयोजन समित्यांनी या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले.
जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक आज घेण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सर्वांचे स्वागत करुन सविस्तर माहिती दिली. 17 ते 19 वर्षा आतील मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धा, संभाव्य 11 ते 13 डिसेंबर 2022 रोजी, 14 वर्षाच्या आतील मुले व मुलींसाठी बुध्दीबळ स्पर्धा संभाव्य 29 ते 31 डिसेंबर 2022 रोजी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील मामाचा गाव रिसॉर्ट येथे होणार आहेत. 19 वर्षाआतील मुले- मुलींसाठी कॅरम स्पर्धा संभाव्य 24 ते 25 डिसेंबर 2022 रोजी सावंतवाडी येथे यशवंतराव भोसले महाविद्यालयात होणार आहेत. या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत होणार आहेत.
वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी आठ शैक्षणिक विभाग व एक क्रीडा प्रबोधिनी यातून 180 खेळाडू, 18 संघ व्यवस्थापक, 20 पंच अधिकारी स्पर्धा निरिक्षक, राज्य संघटनेचे पदाधिकारी, स्वयंसेवक अशा एकूण 218 जणांचा सहभाग होणार आहे. बुध्दीबळसाठी 80 मुले व मुलींसह एकूण 116 जण तर कॅरम स्पर्धेसाठी 96 मुले व मुलींसह एकूण 132 जण सहभागी होणार आहेत.
आयोजन समिती उद्धाटन समारोप समिती, निवास, भोजन, स्पर्धा हॉल व्यवस्थापन समिती, तांत्रिक, वैद्यकीय, प्रसिध्दी आणि कार्यालयीन समितीने या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन डॉ. फड यांनी केले. बैठकीला तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.