You are currently viewing नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार  – पालकमंत्री उदय सामंत…

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार  – पालकमंत्री उदय सामंत…

सिंधुदुर्गनगरी  :

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने कुजले पिक या त्रिसुत्रीनुसार पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे, कुडाळ तालुक्यातील आंब्रड- पावशी, पिंगुळी-गुडीपूर व माणगाव तिटा येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची  शेतात जावून पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, कणकवलीच्या प्रातांधिकारी वैशाली राजमाने, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  एस.एन. म्हेत्रे,  कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार, कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक, कणकवलीचे गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, कुडाळचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण, संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. उदय सामंत पुढे  म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुमारे 55 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लावण आहे. त्यापैकी अंदाजे 6 हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसामुळे बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या कोरोनाची साथ सुरु आहे. यामधून सावरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असतानाच परतीच्या अतिपावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही शासन या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळेल याकडे लक्ष द्यावे. पंचनामे करणाऱ्या यंत्रणांनी गावातील एखाद्या ठिकाणी बसून पंचनामे न करता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समक्ष त्यांची मते जाणून घेवून पंचनामे करावेत. पंचनामे करणाऱ्या क्षेत्राचे महसुली पुरावेही संबंधितानी आपल्या जवळ ठेवावेत. या पुराव्याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडे मागणी करु नये. तसेच पंचनामे करताना सदोष होतील याकडे लक्ष द्यावे. पंचनाम्याच्या कामामध्ये हलगर्जी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
खंडाने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशिल
कोकणपट्टयामध्ये बहुतांशी शेतकरी शेती खंडाने घेवून करतात. निसर्गाच्या प्रकोपामुळे ज्यावेळी शेतीचे नुकसान होते अशा वेळी केवळ ज्यांच्या नावे जमीन आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. खंडाने शेती घेवून वर्षानूवर्षे शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळण्यास यामुळे अडचणी येतात. खंडाने शेती घेवून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही यावेळी नुकसान भरपाई मिळेल यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न करुन अशा वंचीत घटकाला न्याय देण्यात येईल असेही आश्वासन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिले.
कासार्डे नदी क्षेत्राजवळील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव तयार करा.


कासार्डे ता. कणकवली येथे बाधित क्षेत्रातील शेतीची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी कासार्डे गावाजवळील नदीच्या पाण्यामुळे शेतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होते. नदीच्या भागामध्ये असलेल्या गाळामुळे पाणी शेतात येत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. सामंत यांनी संबंधित भागाची पाहणी करुन गाळ काढण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. जलसंपदा विभागाच्या यंत्र सामुग्रीने या भागात गाळ काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल. त्याच बरोबर या ठिकाणी असलेली साकवाची मागणीनीही तातडीने पुर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा